पुणे : राज्यातील अन्नपदार्थांमधील भेसळ आणि नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राबविलेल्या मोहिमांमध्ये पुणे विभागाने दूधभेसळीविरोधात मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत पुणे विभागात एक लाख ५७ हजार ९६५ लिटर दूध जप्त करण्यात आले. राज्यातील सात विभागांच्या तुलनेत हा सर्वाधिक आकडा आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांच्या तपासण्यांमध्येही पुणे विभाग आघाडीवर असून, सणासुदीच्या विशेष मोहिमेत सर्वाधिक परवाने निलंबित करण्याची कारवाई येथे करण्यात आली आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी पुणे विभागात ८०५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यातून एक हजार २०१ नमुने घेण्यात आले. यापैकी १४ नमुने कमी दर्जाचे, तर १३ नमुने असुरक्षित आढळले. या कारवाईत एक लाख ५७ हजार ९६५ लिटर दूध जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत ६६.७३ लाख रुपये आहे. राज्यातील जप्त दुधाच्या एकूण दोन लाख तीन हजार ६२२ लिटर साठ्यापैकी मोठा हिस्सा पुणे विभागातील आहे. दूधभेसळीशी संबंधित पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४७ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यातील या कारवाईतील अटकेचा आकडाही पुणे विभागात सर्वाधिक आहे.
हॉटेल-रेस्टॉरंटच्या १,२४० तपासण्या
हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि अन्य खाद्य आस्थापनांच्या तपासणीत पुणे विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या कालावधीत एक हजार २४० तपासण्या करण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ६७१ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर ९८ परवाने निलंबित करण्यात आले. राज्यभरातील अशा आस्थापनांच्या एकूण पाच हजार ३३५ तपासण्यांपैकी सर्वाधिक तपासण्या पुणे विभागात झाल्या आहेत.
प्रतिबंधित पदार्थांवरही धडक
गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूसारख्या प्रतिबंधित पदार्थांविरोधातील मोहिमेत पुणे विभागात २८३ ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. तपासणी झालेल्या सर्व २८३ आस्थापनांमध्ये प्रतिबंधित पदार्थ आढळले. चार कोटी ५४ लाख ७४ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणांत २६९ गुन्हे दाखल करून ३२४ जणांना अटक करण्यात आली. तसेच २५३ आस्थापना सील करण्यात आल्या आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ३३ वाहने जप्त करण्यात आली.
सणासुदीच्या मोहिमेत ११७ परवाने निलंबित
सप्टेंबर महिन्यातील सणासुदीच्या विशेष मोहिमेत पुणे विभागात एक हजार १४० तपासण्या करण्यात आल्या. या मोहिमेत राज्यात सर्वाधिक ११७ परवाने निलंबित करण्यात आले. ५८७ आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या. एकूण ९२९ अन्ननमुने घेण्यात आले, तर सुमारे १.७७ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. अन्नपदार्थांचा दर्जा आणि सुरक्षिततेबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा एफडीएच्या तक्रार पोर्टलवर संपर्क साधता येणार आहे.
