पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाने गेल्या तीन दिवसांत पुरंदर, वडगाव शेरी आणि शिरूर परिसरात धडक कारवाया करून भेसळयुक्त आंबे, आमरस आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त केला.

राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘सेफ फुड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि बोपगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रांवर १२ आणि १३ जून रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली. एका ठिकाणाहून ५,७०० किलो सडलेले व हलक्या प्रतीचे आंबे नष्ट करण्यात आले. त्याची किंमत २.८५ लाख रुपये इतकी होती. तसेच, भेसळीच्या संशयावरून २.९१ लाख रुपयांचा २ हजार ४३१ किलो आंबा पल्प जप्त करण्यात आला आहे. संबंधित आस्थापनेचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्य एके ठिकाणी १८ किलो पॅकबंद आणि ७१० किलो सुटा हापूस आमरस, असा एकूण ७३,५२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

पुण्यातील वडगावशेरी येथील एका ‘डेअरी अँड स्वीट्स’ दुकानातून खरेदी केलेले पेढे खाल्ल्याने अन्नबाधा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेऊन प्रशासनाने या पेढीची तपासणी केली आणि तेथील नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या पेढीचा परवाना निलंबित करण्यात आला असून, त्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिरूर तालुक्यातील पाबळ येथे १४ जून रोजी राहत्या घरातून प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे समोर आले. प्रशासनाने कारवाई करून १.५३ लाख रुपयांचा साठा जप्त केला असून, शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

प्रशासनाचा इशारा

पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी स्पष्ट केले आहे, की सर्व अन्न व्यावसायिकांनी वैध परवाना घेऊनच व्यवसाय करावा. नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आस्थापनांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील.

कारवाईमध्ये काय झाले?

  • पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि बोपगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रांवर एका ठिकाणाहून ५,७०० किलो सडलेले व हलक्या प्रतीचे २.८५ लाख रुपयांचे आंबे नष्ट करण्यात आले.
  • भेसळीच्या संशयावरून २.९१ लाख रुपयांचा २ हजार ४३१ किलो आंबा पल्प जप्त करण्यात आला आहे.
  • अन्य एके ठिकाणी १८ किलो पॅकबंद आणि ७१० किलो सुटा हापूस आमरस, असा एकूण ७३,५२० रुपयांचा साठा जप्त
  • वडगाव शेरीतील डेअरीचा परवाना रद्द
  • शिरूरमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यास अटक. दीड लाखांचा साठा जप्त