पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यातील वडकी येथील ‘मेसर्स सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’ या कंपनीचा औषध विक्री परवाना रद्द केला. नियमांचे उल्लंघन केल्याने ‘एफडीए’ने ही कारवाई केली. ‘एफडीए’च्या पथकाने जून २०२६ मध्ये या कंपनीच्या वडकी येथील मुख्य गोदामावर छापा टाकला, तेव्हा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न विकायचे औषध असलेल्या ‘शेड्यूल एच’ गोळ्यांच्या पॅकिंगवर ‘अनाल्जेसिक व अँटीपायरेटिक’ असा जाहितरावजा मजकूर छापल्याचे उघडकीस आले. ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० आणि नियम १९४५ नुसार अशा प्रकारची जाहिरात बेकायदा असून, यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच औषधे घेण्याची धोकादायक प्रवृत्ती वाढून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होतो,’ असे ‘एफडीए’कडून स्पष्ट करण्यात आले.
या कारवाईत प्रशासनाने ११.१९ लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. कारवाईनंतर ‘एफडीए’ने संबंधित साठा बाजारातून परत मागविण्याचा आदेश दिला. मात्र, कंपनीने त्याचे पालन केले नाही. त्यानंतर ‘एफडीए’ने केलेल्या तपासणीत औषधांचा साठा जमिनीवर ठेवणे, खरेदी-विक्रीच्या नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत, मुदतबाह्य औषधांच्या व्यवस्थापनात गोंधळ अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. कंपनीने याबाबत दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ‘एफडीए’कडून देण्यात आली.
मुंढे यांचा इशारा
‘औषधांची सुरक्षितता आणि नागरिकांचे आरोग्य याबाबत कोणतीही शिथिलता खपवून घेतली जाणार नाही. विशेषतः ‘शेड्यूल एच’ औषधांची जाहिरात, विक्री आणि वितरणात नियमांचे कठोर पालन व्हायलाच हवे. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू राहील,’ असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
कंंपनीत आढळलेल्या त्रुटी
- औषधांच्या साठवणुकीशी संबंधित व्यवस्थेत त्रुटी
- आषधे खरेदी-विक्रीच्या नोंदी आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत
- औषधांच्या ‘रिकॉल’ संदर्भातील आदेशाचे पालन न करणे.
- औषधांचा साठा जमिनीवर
- औषध साठवणुकीसाठी अपुरी व्यवस्था
- मुदतबाह्य औषधांच्या व्यवस्थापनासंबंधी अभिलेख आणि प्रक्रिया जतनात त्रुटी
सिप्लाची उत्पादने सुरक्षित; पुणे एफडीएच्या आदेशाविरोधात कंपनीची न्यायालयात धाव
अन्न व औषध प्रशासन पुणे विभागच्या वतीने सिप्ला फार्माच्या वडकीतल्या वेअर हाऊस परवाना २७ ऑगस्ट रोजी रद्द केला पार्श्वभूमीवर सी आणि एफ वेअरहाऊसबाबत मिळालेल्या आदेशावर सिप्ला फार्मा आणि लाईफ सायन्सेसने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीने या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे.
न्यायालयीन विचाराधीन असलेल्या या प्रकरणावर या टप्प्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे सिप्लाने स्पष्ट केले आहे. मात्र, कंपनीने हे ठामपणे सांगितले आहे की, एफडीएच्या आदेशात सिप्लाच्या कोणत्याही उत्पादनांच्या सुरक्षिततेवर, गुणवत्तेवर किंवा परिणामांवर कोणताही प्रश्न उपस्थित करण्यात आलेला नाही.
तसेच, या कारवाईचा रुग्णांच्या आरोग्याशी किंवा सुरक्षिततेशी कोणताही संबंध नसून ग्राहकांसाठी कोणताही धोका नाही, असा दिलासा सिप्लाने दिला आहे. गेल्या नऊ दशकांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारी सिप्ला कंपनी गुणवत्तेची उच्च मानके, सर्व नियामक नियमांचे पालन आणि रुग्णांची सुरक्षितता जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.
