Pune FDA Ganpati Mandal Prasad Rules: गणेशोत्सवकाळात भाविकांना अन्नदान, प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) यंदा नोंदणी करावी लागणार आहे. मात्र, या प्रक्रियेविषयी मंडळे संभ्रमावस्थेत असून, स्पष्ट आदेश काही दिवसांत जारी केले जातील, असे ‘एफडीए’ने म्हटले आहे.
‘एफडीए’ने याविषयी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. गणेशोत्सवकाळात गणेश मंडळांचा प्रसाद व अन्नवाटप पूर्णपणे स्वच्छ आणि सुरक्षित असावे, यासाठी काही दिवसांपूर्वी ‘एफडीए’ने नवी नियमावली जारी केली. यामध्ये मंडळांसाठी नोंदणी प्रक्रिया अपरिहार्य असेल, अशी माहिती पुणे विभागाच्या ‘एफडीए’ सूत्रांनी दिली. मात्र, ही नोंदणी कोणी, कशी करायची याचे निकष काय याविषयी मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच, या काळात घरगुती व्यवसाय करणाऱ्यांनी काय करावे या विषयी आदेशात स्पष्टता नसल्याचे मंडळांच्या सूत्रांनी सांगितले.
या दहा दिवसांच्या उत्सवात बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाने विशेष पथकांची निर्मिती केली आहे. ही पथके गणेश मंडळांच्या महाप्रसाद व अन्नवाटपाच्या दर्जाची प्रत्यक्ष पाहणी करतील. त्याचप्रमाणे अन्न तयार करताना होणारी अस्वच्छता किंवा घाण यावरही या पथकांची कडक नजर असणार आहे. पाहणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळून आल्यास संबंधित मंडळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दर वर्षी पोलीस प्रशासन आमच्याकडून फॉर्म भरून घेते. यंदा अन्न व औषध प्रशासनानेही प्रसादवाटपाविषयी नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र, याविषयी कुठे नोंदणी करायची कशी करायची हे माहीत नसल्याने नवीन नियमाविषयी अनभिज्ञ आहोत. अशी माहिती एरंडवणे मधील
श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली.
केटरर्स व्यावसायिक संताजी माने म्हणतात की, अन्न व औषध प्रशासनाने यंदापासून गणेश मंडळांना प्रसाद पुरवणाऱ्या केटरर्सनाही परवाना घेणे बंधनकारक केले आहे. आमचा अतिशय छोट्या प्रमाणावर घरगुती व्यवसाय असून, आम्ही फक्त मोदक बनवतो. नवीन नियमाविषयी माहिती नाही. अर्ज कसा करायचा, नोंदणी कशी करायची, याविषयी प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे.
प्रशासनाचे म्हणणे काय ?
जी गणपती मंडळे अन्नदान करणार आहेत, त्यांना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी १२ महिन्यांसाठी, तीन महिन्यांसाठी अथवा गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीसाठी ही घेता येईल. तीन महिन्यांसाठी नोंदणी करणाऱ्या गणेश मंडळांना नवरात्र दिवाळीपर्यंत अन्नदान, प्रसाद वाटप करण्याची परवानगी मिळणार आहे. तीन महिने आणि दहा दिवसांसाठी नोंदणी शुल्क शंभर रुपये ठेवण्यात आले आहे. या विषयी दोन-तीन दिवसांत स्पष्ट आदेश जारी करण्यात येतील. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग सह आयुक्त वि. दा. भोगावडे यांनी दिली.
या ठिकाणी करा नोंदणी
मंडळांसाठी ‘वेब लिंक’
अन्नवाटप आणि प्रसादवाटप करणारी मंडळे या नव्या नियमांवरून संभ्रमावस्थेत आहेत. प्रशासनाने नोंदणीसाठी https://foscos.fssai.gov.in/apply-for-lic-and-reg ही लिंक दिली असून, यावर मंडळांनी आपली सविस्तर माहिती नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
