पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात दूध भेसळप्रकरणी केलेल्या कारवाईत १६ हजार ७३० लिटर दूध नष्ट केले असून, २५ जणांना अटक केली आहे. ही कारवाई चार ऑक्टोबर रोजी करण्यात आली. ‘एफडीए’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ, त्यांचा पुरवठा, साठवणूक, दूध संकलन, शीतकरण केंद्रांपासून प्रक्रिया उद्योगांपर्यंतच्या संपूर्ण साखळीचा ‘एफडीए’ तपास सुरू केला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून सुरू झालेल्या या तपासात दुधाच्या नमुन्यांमध्ये डिटर्जंट आणि नॉनायलफेनॉल इथॉक्सिलेट आढळून आले आहेत.

या कारवाईत आतापर्यंत ३७ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी २५ जणांना अटक करण्यात आली आहे. मंचर परिसरातील कारवाईदरम्यान दूध भेसळीसाठी वापरले गेल्याचा संशय असलेले ‘व्हे पावडर’ (whey Powder ), ‘व्हे परमिएट पावडर’, डिटर्जंट, इमल्सिफायर आदी पदार्थ आढळून आले. तपासात स्किम्ड मिल्क पावडरचा वापर दुधातील ‘एसएनएफ’ वाढवण्यासाठी, ‘व्हे पावडर’चा वापर प्रथिनांशी संबंधित घटक वाढवण्यासाठी, खाद्यतेलाचा फॅट वाढवण्यासाठी, तर इमल्सिफायर व डिटर्जंटचा विविध घटकांचे मिश्रण करण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये असुरक्षित आढळलेले एकूण १६ हजार ७३० लिटर दूध नष्ट करण्यात आले. या दुधाची एकूण किंमत सुमारे ६ लाख ६९ हजार २०० रुपये आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंचर प्रकरणात आतापर्यंत २६ अन्न आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी निलंबित करण्यासह व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांच्या पुरवठ्यापासून अंतिम दूध पुरवठ्यापर्यंतची संपूर्ण साखळी तपासली जात असून, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावेही तपासण्यात येत आहेत.

कठोर कारवाया सुरूच राहणार – तुकाराम मुंढे

ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. मुदतबाह्य किंवा फेरफार केलेल्या अथवा अस्वच्छ व असुरक्षित परिस्थितीत तयार केलेल्या अन्नपदार्थांची विक्री किंवा साठवणूक करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई सुरू राहील. अशी माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.