पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पुण्यात कारवाई करून ४३ लाख रुपयांचे भेसळयुक्त पनीर आणि खव्याचा साठा जप्त केला. या विशेष मोहिमेत पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील १५ अधिकाऱ्यांच्या पथकाने एका रात्रीत ७० नमुने गोळा केले.
पुण्यातील मनुष्यबळ कमी असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्य कार्यालयाने या मोहिमेत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कुमक घेण्याचे ठरवले. या कारवाईची गेल्या आठवड्यापासून आखणी सुरू होती. त्यानुसार पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील अधिकारी माहिती मिळवित होते.

स्थानिक पातळीवरील संभाव्य राजकीय किंवा व्यावसायिक दबाव टाळता यावा, यासाठी ‘एफडीए’ने जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून कारवाई करण्याची रणनीती निश्चित केली. त्यानुसार सातारा आणि सांगलीच्या पथकाच्या मदतीने पुण्यात छापा टाकून कर्नाटकहून आलेला ४३ लाखांचा पनीरचा साठा आणि खवा जप्त करण्यात आला. या कारवाईत सांगली, सातारा आणि पुण्याचे १५ अधिकारी अधिकारी सहभागी होते. दररोज कर्नाटकातील बागलकोट आणि आजूबाजूच्या परिसरातून पुणे बाजारात पन्नास टन पनीर येत असते मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवायांमुळे आवक निम्म्यावर आली आहे.

सणासुदीच्या तोंडावरही बाजारात फारशी आवक नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. कुठल्याही जिल्ह्यातील अधिकारी कुठेही जाऊन कारवाई करू शकतात. पुण्यातील कारवाई सर्वांत मोठी होती. त्यासाठी पुण्यासह सातारा, सांगली जिल्ह्यातील पथकेही पहाटेपासूनच पुण्यात होती. त्यामध्ये ४३ लाखांचा माल जप्त करण्यात आला. नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून, १४ दिवसांत अहवाल येईल. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन सांगली विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश मसारे यांनी दिली.