पुणे : सणासुदीच्या काळात प्रतिबंधित आणि निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात १ आणि २ ऑक्टोबर रोजी सात ठिकाणी कारवाई केली. त्यात एक लाख ३८ हजार १०५ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान चार आस्थापने बंद करण्यात आली, तर ६० हजार रुपये किमतीचे एक वाहन जप्त करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाने सदासुदीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळी विरोधात मोहीम उघडली आहे. याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या तुपाच्या साठ्यावर प्रशासनाने कारवाई केली. येथे २४५ किलो तूप जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत दोन लाख २९ हजार ५०० रुपये आहे. तुपाच्या लेबलिंगमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. तसेच, तूप निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय असल्याने हा साठा ताब्यात घेण्यात आला.

मावळ तालुक्यातील वरसोली येथील एका आस्थापनावरही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी दोन हजार ९०६ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये १०८ किलो मिश्र चिक्की आणि दोन हजार ७९८ किलो सैल भाजलेल्या शेंगदाण्यांचा समावेश आहे. या साठ्याची किंमत चार लाख ९५ हजार २०० रुपये आहे. संबंधित अन्नपदार्थांच्या लेबलिंगमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे तसेच साठा निकृष्ट दर्जाचा असल्याचा संशय प्रशासनाला आढळून आला.

पुणे विभागातील या तीन कारवायांमध्ये एकूण चार हजार २८९ किलो अन्नपदार्थ आणि एक हजार २३८ पाकिटे जप्त करण्यात आली. या सर्व जप्त साठ्याची एकत्रित किंमत सात लाख ६१ हजार ८४० रुपये असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.