पुणे : अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत १ ते ९ ऑगस्टदरम्यान पुणे विभागातील विविध ठिकाणी तपासणी करून १२ आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी तात्काळ निलंबित केले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

या कारवाईत ४१.३६ लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला. संबंधितांविरोधात पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून २४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत १४ अन्न आस्थापना सील करण्यात आल्या असून चार वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. जप्त वाहनांची किंमत सुमारे १४ लाख ९० हजार रुपये असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

दरम्यान, पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एका वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना विक्रीसाठी मावा स्वीट वाहतूक होत असल्याचे आढळले. या साठ्यातून अन्नपदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला असून उर्वरित सुमारे ९८ किलो मावा स्वीटचा ९ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. व्यावसायिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

अन्न सुरक्षा प्रशासनाने हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरी व्यावसायिकांना ग्राहकांना मोफत आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, अन्नपदार्थांसाठी योग्य दर्जाचे ‘फूड ग्रेड’ साहित्य वापरणे, विनापरवाना व्यवसाय न करणे, वापरलेले तेल पुन्हा वापरू नये आणि मेन्यू कार्डवर दिशाभूल करणारी माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे.