पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आणि फरसाण विक्री करणाऱ्या आस्थापनांमधील अन्नपदार्थांच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात धडक कारवाई केली. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील १५ आस्थापनांची तपासणी करून एकूण ३,१९६.२ किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. त्यापैकी १,४४०.५ किलो खाद्यपदार्थ जागेवरच नष्ट करण्यात आले. नष्ट केलेल्या साठ्याची किंमत चार लाख ३५ हजार २०० रुपये असून, जप्त केलेल्या एकूण साठ्याची किंमत १६ लाख ९३ हजार २९५ रुपये आहे. आठ आस्थापनांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून, तीन आस्थापनांचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती एफडीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत तीन नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन व विक्रीतील स्वच्छता, साठवणूक, हाताळणी, अखाद्य रंगाचा वापर तसेच अन्नसुरक्षा नियमांचे पालन यांची तपासणी करण्यात आली.
पुण्यातील प्रसिद्ध मिठाई दुकानांवर कारवाई
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कराची स्वीट मार्ट, श्री गणेश लाडूवाले, राजमिलन स्वीट्स, पुणेरी स्वीट्स आणि बिकानेर मिठाईवाले या आस्थापनांमध्ये एफडीएने तपासणी केली. अस्वच्छता, संशयित निकृष्ट दर्जा आणि अयोग्य साठवणुकीच्या कारणांवरून खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. मंचर येथील राजमिलन स्वीट्समधील २५० किलो मावा, शिक्रापूर येथील श्री गणेश लाडूवाले यांच्याकडील ६०५ किलो मिठाई, तर कॅम्पमधील कराची स्वीट मार्टमधील १८६ किलो खाद्यपदार्थांचा त्यात समावेश आहे. मोहम्मदवाडी येथील बिकानेर मिठाईवाल्यांकडील २६८ किलो बर्फीही नष्ट करण्यात आली.
पौर्णिमा स्वीट्स आणि जनता स्वीट्स या आस्थापनांकडे आवश्यक परवाना अथवा नोंदणी नसल्याने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. सांगलीतील आशिष ट्रेडर्सकडील ७४९ किलो बदाम चुकीचे लेबल आणि संशयित निकृष्ट दर्जामुळे जप्त करण्यात आले. तसेच कोल्हापुरातील विनायक ट्रेडिंगकडील काजू व काजू कणी आणि सोलापूरमधील जस राज स्वीट्समधील मिठाईचाही जप्त साठ्यात समावेश आहे.
अखाद्य रंगाचा वापर; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
सांगलीतील न्यू बालाजी बेकर्स अँड नमकीन आणि श्री सिरवी बंधू मिठाईवाले यांच्यावरही कारवाई करण्यात आली. खाद्यरंगाचा अयोग्य वापर, लेबलिंगमधील त्रुटी, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन अशा बाबी तपासणीत समोर आल्या. मिठाईच्या उत्पादन आणि विक्रीमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे या तपासण्यांमधून स्पष्ट झाले.
अन्न व्यावसायिकांनी आवश्यक परवाने व नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, परिसरात स्वच्छता राखावी, खाद्यपदार्थांची योग्य साठवणूक व हाताळणी करावी आणि लेबलिंगसह अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
