पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर पिझ्झा हट, डॉमिनोज, ‘केएफसी’सारख्या जंक फूड विक्री करणाऱ्या आस्थापना आल्या असून, ४३ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दोन साखळी उपाहारगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. याबरोबरच, १० आणि ११ ऑगस्ट रोजी पुणे विभागात विविध ठिकाणी केलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची (गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू इत्यादी) बेकायदा विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
‘एफडीए’ला नऊ आस्थापनांमध्ये प्रतिबंधित माल आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान ३,३६,१६३ रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असून, ९ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, ८ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरलेले ६ लाख रुपये किमतीचे १ वाहनदेखील जप्त करण्यात आले आहे.
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांच्या तपासणी मोहिमेत पुणे विभागातील ४५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. याबरोबरच डॉमिनोज, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड्स, सब-वे, स्टारबक्स यांसारख्या प्रसिद्ध ‘चेन रेस्टॉरंट्स’मध्ये ११ ऑगस्ट रोजी राबवलेल्या विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत पुणे विभागात ४७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षेचे आणि स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या ४३ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून २ साखळी उपाहारगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
प्रतिबंधित पदार्थ सोडून इतर अन्नपदार्थांच्या तपासणीत पुणे विभागातील ३ आस्थापनांमधून १९५८ किलो वजनाचा एकूण ३,०२,६०० रुपयांचा संशयित अस्वच्छ/निकृष्ट दर्जाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
