पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात सहा महिन्यांत चार कोटी रुपयांचा मसाल्यांचा माल जप्त करण्यात आला असून, २३ ते २९ ऑक्टोबरदरम्यान राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १३ कोटी ६० लाख रुपयांचा ९ लाख ६१०.२५ क्विंटल मसाल्यांचा माल जप्त करण्यात आला. या सहा महिन्यांच्या काळात पुणे विभागातील तपासण्या आणि सुधारणा नोटिसांची संख्या राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

१ एप्रिल ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पुणे विभागात ३५९ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांना १४२ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. या कालावधीत पुणे विभागातून १,९१०.०७ क्विंटल मसाले व मसाल्यांचे पदार्थ जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत ३ कोटी ९९ लाख ५३ हजार रुपये आहे, अशी माहीती ‘एफडीए’ने पत्रकाद्वारे दिली.

राज्यात या सहा महिन्यांत एकूण १,०५७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यातून १,६१६ नमुने घेण्यात आले, तर ५५७ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. एकूण ८४ अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. राज्यात ११ हजार ९६३.८७ क्विंटल मसाले आणि मसाल्यांचे पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत सुमारे १९ कोटी ६९ लाख रुपये आहे. तर, पुणे विभागात ३ कोटी ९९ लाख ५३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

पुणे विभागात चौदा परवाने निलंबित

मसाल्यांच्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान पुणे विभागात १४ अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. २३ ते २९ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत राज्यात ४७२ आस्थापनांची तपासणी करून २४९ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. या मोहिमेत ९ हजार ६१०.२५ क्विंटल मसाले व मसाल्यांचे पदार्थ जप्त करण्यात आले. जप्त साठ्याची किंमत १३ कोटी ६० लाख रुपये आहे.

अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार नोंदणी

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत अथवा कोणत्याही व्यावसायिक गैरप्रकाराबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ वर किंवा अधिकृत https://complaints.mahafda.in वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.