पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाने अन्न व औषध प्रशासनाकडून राबिवण्यात येत असलेल्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत शहरातील ७० हॉटेल आणि रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने सात हाॅटेल्सचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
निलंबित करण्यात आलेल्या परवान्यंमध्ये हॉटेल ग्रँड पुरंदर सिंहगड रस्ता, क्राऊन बेकर्स सिंहगड रस्ता, मे. ॲग्रोटीस केटरिंग प्रा. लि. (ता. आंबेगाव) बरकत बिर्याणी हाऊस वाघोली, रॉयल बिर्याणी हाऊस, वाघोली आणि नॅशनल ३६० बावधन,या हॉटेल्सचा समावेश आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हाॅटेल्स आणि रेस्टारंटवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान ‚ अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ‘सेफ फुड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ राबविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन पुणे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. देवांश मिल्क अॅन्ड मिल्क प्रॉडक्टस, स नं. २१/१/३, शिव पार्वती अंगण, भालेकर नगर, पिंपळे गुरव, पुणे या आस्थापनेची तपासणीवेळी २३० कि.ग्रॅ. रुपये ९० हजार ५०० किंमतीचा साठा विना लेबल व भेसळीच्या संशयावरुन जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींची गंभीर दखल घेत ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
