पुणे : ‘गर्भावस्थेत मद्याचा एक घोटही बाळाच्या मेंदूवर आणि संपूर्ण आयुष्यावर गंभीर परिणाम करू शकतो. गरोदरपणात आईने घेतलेले अल्कोहोल थेट गर्भापर्यंत पोहोचते आणि बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासात मोठा अडथळा निर्माण करते. त्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या गर्भावस्थेत दारूचे कोणतेही प्रमाण सुरक्षित मानले जात नाही. गरोदरपणातील संपूर्ण ९ महिने दारूपासून दूर राहणे हाच बाळाला सुरक्षित ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे,’ असे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले.
९ सप्टेंबर रोजी पाळल्या जाणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय फीटस अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स’ अर्थात ‘आंतरराष्ट्रीय भ्रूण अल्कोहोल स्पेक्ट्रम विकार’ जनजागृती या दिनानिमित्त वैद्यकीय तज्ञांकडून ही बाब अधोरेखित करण्यात येत आहे. आरोग्य तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गर्भावस्थेत मद्यसेवन केल्यास बाळाच्या प्रकृतीवर काही लक्षणे दिसू शकतात. बाळाची शारीरिक वाढ खुंटणे, जन्मतः वजन कमी असणे, स्मरणशक्ती कमकुवत होणे, समजून घेण्यास वेळ लागणे आणि अभ्यासात किंवा कामात लक्ष केंद्रित करता न येणे, काही गंभीर प्रकरणांमध्ये चेहऱ्याच्या रचनेत बदल होऊ शकतो, मेंदूचा विकास पूर्णतः झाल्याने निर्णय घेण्याची क्षमता क्षीण होऊ शकते.
संशोधनातील आकडेवारी काय सांगते ?
‘जेनासिस इंडिया’ या संस्थेच्या अभ्यासानुसार, साधारण ५.८ टक्के महिलांनी वर्षातून किमान एकदा मद्यपान केल्याचे नमूद केले आहे. मात्र, उच्च धोक्याच्या गटांमधील (उदा. आदिवासी महिला, चहाच्या मळ्यातील कामगार, सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग आणि व्यावसायिक लैंगिक कामगार) महिलांमध्ये हे प्रमाण २८ टक्के ते ४८ टक्के इतके लक्षणीय आहे.
तज्ज्ञांचा सल्ला काय ?
स्त्री रोग तज्ञ डॉक्टर वैशाली कोरडे पाटील यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की,गर्भावस्थेत नाही, तर जेव्हा मातृत्वाचा निर्णय घेतला जातो, त्या क्षणापासून दारू थांबवणे आवश्यक आहे. दारूचे थोडेही सेवन धोक्याचे ठरू शकते. अल्कोहोल प्लासेंटा पार करून थेट बाळापर्यंत पोहोचते आणि त्याचे यकृत ते पचवू शकत नाही. यामुळे बाळाच्या मेंदूला कायमस्वरूपी इजा, हृदयातील दोष किंवा वाढ खुंटण्याची शक्यता असते. म्हणूनच, बाळ हातात येण्याआधीपासूनच त्याच्यावर प्रेम करा आणि पूर्ण नऊ महिने अल्कोहोलला पूर्णपणे ‘नाही’ म्हणा!
महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष आणि जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अलका क्षीरसागर म्हणाल्या की,गेल्या काही काळात महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण वाढते आहे. मात्र, गर्भधारणेची वेळ येते, अशा वेळी हे व्यसन सुटणे आवश्यक असते. कित्येक जणी या पासून दूर राहू शकत नाही. त्यामुळे याचा परिणाम थेट अर्भकाच्या वाढीवर होतो. दुसरीकडे मात्र झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या महिलांमध्येही व्यसनाचे प्रमाण असून, त्याचेही दुष्परिणाम बाळावर होतात.
