पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाट परिसरात अग्निशामक दलाकडून जवान तैनात करण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीतील दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशामक दल सज्ज झाले असून, सोमवारी दलाच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्रातील विसर्जन घाटांची पाहणी केली.
विसर्जन सोहळ्यासाठी मुठा नदीपात्रालगत असलेल्या विसर्जन घाटांवर भाविकांची गर्दी होती. नदीपात्रात पाय घसरून पडण्याची शक्यता असल्याने विसर्जन घाटांवर जीवरक्षक, अग्निशामक दलाचे जवान उत्सवाच्या कालावधीत तैनात करण्यात येणार आहेत. नदीपात्रालगत १५ मुख्य विसर्जन घाट आहेत. तेथे अग्निशामक दलाचे २० अधिकारी, २० जवान आणि १२० जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेेत. जवानांकडे लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, दोरी असे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मुख्य अग्निशामक अधिकारी गणेश सोनूने, सहायक अधिकारी विजय भिलारे यांच्यासह अधिकाऱ्यांनी सोमवारी विसर्जन घाटांची पाहणी केली. विसर्जन घाटावर तैनात असणारे अधिकारी, जीवरक्षक, जवानांशी संवाद साधून भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.
दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसानंतर ‘श्रीं’चे विसर्जन करण्याची प्रथा आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन घाटांवर भाविकांची घाटांवर गर्दी होते. विसर्जन घाटांसह विसर्जन मार्गावर अग्निशमन दलाचा बंब ठेवण्यात येणार आहे. नदीपात्र, तलाव परिसरात जीवरक्षक तैनात करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
