पिंपरी-चिंचवडमधील पाच तरुणांनी अनोख्या पद्धतीने गिर्यारोहक अरुण सावंत यांना श्रद्धांजली वाहिली. सावंत यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला वानर लिंगी सुळका सर केला होता. तोच सुळका सर करत या तरुणांनी अनोख्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली. वानर लिंगी सुळका हा चारशे फुटांपेक्षा अधिक उंच असून दोन्ही बाजूनी दरी आहे. त्यामुळे जीव मुठीत घेऊन हा सुळका सर करावा लागतो. सुळक्यावर गेल्यानंतर तरुणांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.

गितेश बांगरे, मोहन हुले, ज्ञानेश्वर फुगे, किरण गावडे, तुषार खताळ अशी या गिर्यारोहकांची नावे आहेत. अरुण सावंत यांचा हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्यावरून पडून गेल्या शनिवारी मृत्यू झाला. रॅपलिंग करताना तोल गेल्याने कड्यावरुन ते दरीत कोसळले. या घटनेमुळे गिर्यारोहकांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील गीतेश, मोहन, ज्ञानेश्वर, किरण, तुषार या पाच गिर्यारोहकांनी अरुण सावंत यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्याचे ठरवले होते. त्यानुसार नाणे घाट जीवनधन किल्ल्याशेजारी असणारा वानर लिंगी सुळका सर करण्याचे ठरवले.

बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना हा सुळका सर करण्यास सुरुवात केली. सर्वांनी सुरक्षेसाठी आवश्यक असणारी साधने वापरली. रोपच्या साहाय्याने पाच जणांनी सुळका सर करण्यास सुरुवात केली. अत्यंत आव्हानात्मक असलेला सुळका हा दोन दऱ्यांच्या मधोमध आहे. खाली पाहिल्यानंतर भल्याभल्याना धडकी भरते. तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर वानरलिंगी सुळका सर करण्यात त्यांना यश आले. सुळक्यावर पोहचल्यानंतर अरुण सावंत यांना दोन मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

“वानर लिंगी सुळका सर करणं फार कठीण काम आहे. गिर्यारोहक अरुण सावंत यांनी हा सुळका सर केलेला आहे. त्यांना त्याच माध्यमातून श्रद्धांजली द्यायची होती. त्यामुळे वानर लिंगी सुळका सर केला. वानर लिंगी सुळका हा चारशे फुटांपेक्षा उंच हा सुळका आहे,” अशी गिर्यारोहक गीतेश बांगरे याने दिली. “अरुण सावंत यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. गिर्यारोहण क्षेत्रात अनेक वर्षे त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या जाण्याचे दुःख आहे. त्यामुळे सुळका सर करून अनोख्या पद्धतीने सावंत याना श्रद्धांजली वाहिली,” असे गिर्यारोहक ज्ञानेश्वर फुगे म्हणाला.