पुणे : सदनिकेतून सात लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. चोरट्याने सदनिकेच्या दरवाज्यावर ठेवलेली चावी घेऊन कुलूप उघडले. चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार वाघोलीतील काळूबाईनगर परिसरात असलेल्या अश्विनी रेसिडन्सी सोसायटीत राहायला आहेत. त्या १७ जून रोजी दुपारी सदनिका बंद करून कामानिमित्त घरातून बाहेर पडल्या. त्यांनी सदनिकेची चावी दरवाज्याजवळ ठेवली होती. चावी ठेवलेली जागेची माहिती महिलेच्या कुटुंबीयाना असते. त्यामुळे महिला नेहमी दरवाज्याजवळ असलेल्या जागेत चावी ठेवायची.
चोरट्याने दरवाज्याजवळ ठेवलेली चावी घेऊन सदनिकेचे कुलूप उघडले. शयनगृहातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सात लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटा पसार झाला. महिला सायंकाळी घरी आली. तेव्हा ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक बागल तपास करत आहेत.
अनेकजण सदनिकेची चावी दरवाज्याजवळील कुंडीत, सापटीत तसेच पादत्राणे ठेवण्याच्या रॅकमध्ये ठेवतात. चावीची जागी कुटुंबीयांना माहीत असते. सदनिकेच्या परिसरात ठेवलेली चावी चोरून ऐवज लांबविण्याच्या घटना घडल्या आहेत. कोथरूड आणि मार्केट यार्ड भागात गेल्या वर्षी सदनिकेच्या परिसरात ठेवलेली चावी चोरून चोरट्यांनी ऐवज चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या.
कोंढव्यात घरफोडी
कोंढवा परिसरातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोंढवा परिसरातील इशा पर्ल सोसायटीत राहायला आहेत. त्या १६ जून रोजी सायंकाळी बाहेर पडल्या होत्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाटातून दोन लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
मंदिरातील दानपेटी फोडली
चंदननगर भागातील एका मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी १६ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत सुखदेव विट्ठल साकोरे (वय ६३, रा. शिवशक्ती चौक, गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव शेरीतील जुन्या मुंढवा रस्त्यावर संत श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आहे. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. मंदिरातील दानपेटीचे कुलूप उचकटून १६ हजारांची रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत