पुणे : परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करण्यात आली. यंदा या शिष्यवृत्तीसाठी २१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, हे विद्यार्थी ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, युनायटेड किंग्डम, सिंगापूर, डेन्मार्क, नेदरलँड, जर्मनी अशा देशांतील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणार आहेत. योजनेच्या पात्र विद्यार्थिसंख्येत घट होत असल्याचे दिसून येते.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील गुणवंत मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती ही योजना २०१८पासून राबवण्यात येते. पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी ४० जागांसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. विद्यार्थिहितास्तव  फेरआढावा घेऊन योजनेमध्ये अंशतः बदल करून सुधारित निर्णय १० जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७च्या शिष्यवृत्ती प्रक्रियेंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १७ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत २१ पात्र उमेदवारांना शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पदव्युत्तर पदवीसाठी निवडलेल्या अभ्यासक्रमांमध्ये अर्थशास्त्र, खगोलभौतिकी, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवशास्त्र, व्यवस्थापन, माहिती सुरक्षा, संगणकशास्त्र, सायबर सुरक्षा, वास्तुरचना डिझाइन,  औषधनिर्माणशास्त्र आणि तंत्रज्ञान अशा विषयांचा समावेश आहे.

पात्र विद्यार्थ्यांना गृह विभागाच्या चौकशीच्या अधीन राहून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. चौकशीमध्ये विद्यार्थ्यांनी अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल. शिष्यवृत्तीसंदर्भातील पूर्तता करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असेल. कोणतीही कागदपत्रे अपूर्ण राहिल्यास, शिष्यवृत्तीला विलंब झाल्यास त्यात विद्यार्थी जबाबदार असेल.

विद्यार्थ्याने निवड केलेला अभ्यासक्रम ठरलेल्या कालावधीतच पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्या कालावधीमध्ये वाढ झाल्यास कोणताही अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही. शिष्यवृत्ती प्रदान केल्यानंतर शिष्यवृत्तीसाठीचा अर्ज, कागदपत्रांत विसंगती आढळल्यास शिष्यवृत्ती एकरकमी वसूल करण्यात येईल. त्यासाठी जामीनदारांस जबाबदार धरण्यात येईल. तसेच विद्यार्थी, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पात्र विद्यार्थिसंख्येत घट

सन २०२४-२५मध्ये २६, २०२५-२६साठी २४ उमेदवारांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली होती. तर यंदा २१ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते.