पिंपरी : परवानाधारक पिस्तुलामधून हवेत गोळीबार करून इतरांच्या जिवाला धाेका निर्माण करणे चार जणांना भाेवले. चाैघांचे पिस्तूल परवाने रद्द करण्याचा आदेश पिंपरी-चिंचवडचे पाेलीस आयुक्त विनयकुमार चाैबे यांनी घेतला आहे. दिनेश बाबुलाल सिंग (रा. मामुर्डी, देहुरोड), गणपत बाजीराव जगताप (रा. मारुंजी), संतोष दत्तात्रय पवार (रा. कुदळवाडी, चिखली) आणि संतोष पांडुरंग कदम (रा. ताथवडे) यांचे पिस्तूल परवाने रद्द केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फार्म हाऊसवर आठ जुलै रोजी पार्टी सुरू हाेती. या वेळी सिंग यांनी त्यांच्याकडील परवानाधारक पिस्तुलामधून हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे उपस्थितांच्या जिवाला धाेका निर्माण झाला होता. यामुळे सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला हाेता. त्यानंतर पिस्तुलाचा गैरवापर केल्याने बावधन पोलिसांनी सिंग यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाेलीस आयुक्तांकडे पाठविला हाेता.

जगताप यांनी त्यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल बेकायदापणे एका व्यक्तीला दिले. या व्यक्तीने पुणे ग्रामीण हद्दीतील यवत येथील अंबिका कला केंद्रात २१ जुलै राेजी हवेत गोळीबार केला होता. त्यामुळे जगताप यांच्याकडील पिस्तूल परवाना रद्द करण्यासाठी पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी पाेलीस आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला हाेता. या दाेन्ही घटनांची पाेलिसांनी गंभीर दखल घेतली. शस्त्र परवाने रद्द करण्यासाठी प्राथमिक चौकशी केली. चौकशीअंती परवानाधारक यांनी त्यांच्याकडील पिस्तुलाचा गैरवापर केल्याचे आढळून आहे. त्यामुळे पिस्तूल परवाने रद्द केले आहेत.

चालू वर्षात पिस्तुलाचा गैरवापर केल्याबद्दल संतोष पवार आणि संतोष कदम यांचेदेखील पिस्तूल परवाने रद्द केले आहेत. पिंपरी-चिंचवड पाेलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आतापर्यंत चार जणांचे पिस्तूल परवाना रद्द केले आहे.