पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार या परीक्षेचा निकाल २७.०९ टक्के लागला असून, चौथी आणि सातवीचे मिळून ३३ हजार २८१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर झाली. त्यानंतर २५ जुलै रोजी परीक्षा अंतरिम निकाल जाहीर करून गुणपडताळणीचे अर्ज मागवण्यात आले होते. आलेले अर्ज निकाली काढून अंतिम निकाल तयार करण्यात आला. इयत्ता चौथी आणि सातवीच्या मिळून ११ लाख ५६ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १० लाख ९१ हजार २५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २ लाख ९५ हजार ५४६ विद्यार्थी पात्र झाले, तर ३३ हजार २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.
इयत्ता चौथीच्या ६ लाख ९४ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ६ लाख ५७ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ७६ हजार ५८६ विद्यार्थी परीक्षेत पात्र झाले, तर १६ हजार ६९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. चौथीचा एकूण निकाल २६.८७ टक्के लागला. इयत्ता सातवीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ४ लाख ६२ हजार १४१ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ३३ हजार ८७० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. १ लाख १८ हजार ९६० विद्यार्थी पात्र ठरले, तर १६ हजार ५८८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. सातवीचा एकूण निकाल २७.४२ टक्के लागला.
अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचाच्या अधीन राहून, तसेच शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार ज्या जिल्ह्यात अथवा तालुक्यात मंजूर संच संख्येच्या प्रमाणात विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत, असे उर्वरित संच इतर जिल्हा किंवा तालुक्याला हस्तांतरित करून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी, प्रमाणपत्र संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्याचे गुणपत्रक, प्रमाणपत्राची डिजिटल प्रत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. शाळेने उत्तम प्रतिच्या कागदावर त्याची रंगीत प्रत घेऊन विद्यार्थ्यांना वितरित करावी. तसेच डिजिटल प्रत मागणीनुसार उपलब्ध करावी. गुणपत्रकाची डिजिटल प्रत उपलब्ध केली असल्याने छापील गुणपत्रक वितरित केले जाणार नाही, असे परीक्षा परिषदेने नमूद केले.
