पुणे : ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे…’ असे लिहिणारे गजानन दिगंबर माडगूळकर हे किती द्रष्टे होते, याची प्रचिती रसिकांना सोमवारी आली. असंख्य गीतांची निर्मिती झालेल्या आणि काव्याच्या मैफिलींनी रंगलेल्या ‘गीतरामायण’कार गदिमांच्या ‘पंचवटी’ या वास्तूवरून सुरू झालेले नात्यांचे ‘महाभारत’ आणि त्याचे समाजमाध्यमात उमटलेले पडसाद पाहून तमाम मराठी साहित्यप्रेमी हळहळले. ‘कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही’ या गदिमांच्याच काव्यपंक्तीची प्रचिती कुटुंबीयांच्या टीका-टिप्पणीवरून आली. ‘काही करून हे वाद चव्हाट्यावर आणू नयेत,’ अशी विनंती गदिमाप्रेमी रसिकांनी दोन्ही बाजूंकडील कुटुंब सदस्यांना केली.

‘पंचवटी’ या निवासस्थानावरून माडगूळकर कुटुंबातील अंतर्गत वाद सोमवारी समाजमाध्यमातून चव्हाट्यावर आला. ‘कुटुंबातील काही व्यक्तींकडून ही वास्तू पाडून बांधकाम व्यावसायिकाला विकण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ अशी टिप्पणी करून गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी आपल्याच नातेवाइकांवर गंभीर आरोप केले. दुसरीकडे, सुमित्र यांच्या आई शीतल श्रीधर माडगूळकर यांनी त्या आरोपांना प्रत्युत्तर देणारे आणि वर्तनासंदर्भात काही प्रश्न उपस्थित करणारे पत्र समाजमाध्यमावर प्रसारित केले.

पुणे-मुंबई रस्त्यावरील वाकडेवाडी येथे डाव्या बाजूला ‘पंचवटी’ या टुमदार बंगल्यामध्येच गदिमांनी चित्रपट गीते, भावगीते, गीतरामायण अशा अलौकिक काव्याची निर्मिती केली. अनेकांचा राबता असलेल्या साहित्यिक मैफिलींची मूक साक्षीदार असलेली वास्तू पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा सुमित्र माडगूळकर यांनी केला. ‘गदिमांचा वारसा जपल्याचे समाजात सांगणारे प्रत्यक्षात ही वास्तू पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या वास्तूला वाचविण्याचा प्रयत्न केल्यामुळे मला आणि माझ्या पत्नीला बदनाम केले जात असून, आमच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे,’ असा आरोप त्यांनी केला. मात्र, ‘कितीही बदनामी झाली, तरी मी ‘पंचवटी’ पाडू देणार नाही. कोथरूडमध्ये साकारण्यात येणाऱ्या स्मारकाइतकीच पंचवटीदेखील माझ्यासाठी महत्त्वाची आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

या आरोपांनी व्यथित झालेल्या गदिमांच्या स्नुषा आणि सुमित्र यांच्या मातु:श्री शीतल श्रीधर माडगूळकर यांनीही आपली बाजू समाजमाध्यमावर मांडली. ‘तेव्हा तू कुठे होतास?’ या शीर्षकांतर्गत सुमित्र यांच्या वर्तनाविषयी आक्षेप घेणारे ११ प्रश्न त्यांनी उपस्थित केले. ‘गदिमांच्या प्रेमाचा, आदराचा गैरफायदा घेण्याचा तुझा प्रयत्न तर चुकीचाच आहे. परंतु, माझ्यावरच आरोप करतोस याला काय म्हणू,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 ‘वास्तूसंदर्भातील निर्णय गदिमांच्या अपत्यांचाच’

समाजमाध्यमांवर सुरू झालेल्या या वादानंतर ‘लोकसत्ता’ने संपर्क साधला असता, समाजमाध्यमावर मांडलेल्या भूमिकेवर मी ठाम असल्याचे सुमित्र यांनी सांगितले. शीतल माडगूळकर म्हणाल्या, ‘पंचवटी पाडत असल्याचा आरोप करून माझ्याच मुलाने हा ‘पब्लिसिटी स्टंट’ केला आहे. ही वास्तू विकायची आहे, असे गृहीत धरले, तरी हा निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही. कारण, गदिमांना सात अपत्ये आहेत. त्यापैकी एक मुलगा आणि तीन मुली हयात आहेत. त्यांचीही संमती लागेल. माझे पती (सुमित्र यांचे वडील) दिवंगत श्रीधर माडगूळकर यांनी मालमत्तेतील त्यांच्या वाट्याचा वारसदार म्हणून माझे नाव दिले आहे. मुलगा यात वाटा मागत असला, तरी त्याची बहीणही ५० टक्के भागीदार आहे.’