येरवडा भागातील मनोरुग्णालयात वसाहत परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार अड्ड्याचा मालक, कामगार तसेच जुगार खेळणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

येरवड्यातील मनोरूग्णालय वसाहत परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गु्न्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. पोलिसांना पाहताच जुगार खेळणारे चार जण पसार झाले. पोलिसांनी जुगार अड्ड्याचा मालक तसेच कामगारांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी चार मोबाइल संच, २३ हजार ८४० रुपयांची रोकड जप्त केली.

या प्रकरणी माणिक आडे, विशाल गुप्ता, धम्मपाल टोम्पे, देवा पिल्ले, बाबू शिंदे, मालकोंड्या रागम, विशाल पाटील, बंटी मिश्रा, अक्रम सिद्दीक यांच्यासह १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, प्रमोद माेहिते, मनीषा पुकाळे, अण्णा माने आदींनी ही कारवाई केली.