पुणे : गणेशोत्सवाची चाहूल आता लागली असून, दर वर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत. बाजारात विविध रंगांतील व आकारांची मखरे, नक्षीदार देव्हारे आणि थर्माकोलला उत्तम पर्याय ठरणाऱ्या ‘पीव्हीसी फोम’च्या देवदेवतांच्या सुबक प्रतिकृती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय, प्लास्टिकच्या रंगीबेरंगी फुलांच्या माळा, विशिष्ट कापडाची सुबक फुले, तोरणे, प्रकाश फेकणाऱ्या छोट्या दिव्यांच्या माळा अशा सजावटीच्या साहित्याने बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी आणि लगबग पाहायला मिळत आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात सजावटीच्या बाबतीत अनेक नवे ट्रेंड्स आणि वैविध्य पाहायला मिळत आहे. पर्यावरणपूरक आणि नावीन्यपूर्ण मखर आणि अब्दागिरींना मोठी मागणी आहे. विशेषतः थर्माकोलला उत्तम पर्याय म्हणून गेल्या काही वर्षांपासून ‘पीव्हीसी फोम’मधील स्वस्तिक, कलश, श्रीफळ, विड्याचे पान, मूषक आणि विविध देव-देवतांच्या आकर्षक चित्रांना ग्राहक पसंती देत आहेत. यंदा मखर आणि देवघरांच्या डिझाईन्समध्ये वैविध्य दिसत असून, गजकेसरी, ‘हनुमान’ आणि ‘सूर्य’ या संकल्पनांवर आधारित मखरींना बाजारात सर्वाधिक मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सजावटीच्या इतर साहित्यामध्ये प्लास्टिकच्या फुलांच्या माळांना ग्राहकांची पसंती कायम आहे. मात्र, यंदा साध्या फुलांपेक्षा मोत्यांची विशेष सजावट असणाऱ्या माळा ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय, सुट्या रंगीबेरंगी आणि शोभिवंत प्लास्टिकच्या फुलांची खरेदीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. दर वर्षीच्या पारंपरिक फुलांपेक्षा यंदा या नव्या सजावटीच्या शोभिवंत फुलांना बाजारात अधिक मागणी आहे.

सजावटीसाठी हार (छाया. लोकसत्ता टीम)

रोषणाई आणि तोरणे

बाजारात तोरणेही लक्ष वेधून घेत आहे. पारंपरिक पाना-फुलांची आणि देवदेवतांच्या तोरणांना दर वर्षीप्रमाणे चांगली मागणी आहे. घरातील सजावटीला खरी शोभा आणते ती म्हणजे विद्युत रोषणाई! विविध तोरणांसह रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी बाजारपेठ उजळली आहे. यात प्रामुख्याने विविध रंगांचा प्रकाश देणाऱ्या एलईडी माळा, प्रकाशझोत टाकणारे विशिष्ट रंगाचे फिरते दिवे आणि रंगीबेरंगी बल्ब यांचा समावेश आहे.

फुलांच्या सजावटीसाठी साहित्य (छाया. लोकसत्ता टीम)

व्यापारी पर्यावरण प्रेमी काय सांगतात ?

ऑनलाइन वर कितीही चांगले पर्याय असले तरी ग्राहक प्रत्यक्ष आणि थेट खरेदीवरच भर देतात त्यामुळे ऑनलाइनचा दुकानदारांवर काहीही परिणाम झालेला नसल्याची माहिती घाऊक विक्रेते असणारे गाला प्लास्टिकचे अमृत शहा यांनी दिली. ते म्हणाले की,बाजारपेठेत ग्राहकांची मोठी झुंबड आहे. ऑनलाइनवर सजावटीचे कितीही पर्याय उपलब्ध असले, तरी आजही गणपती, दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांसाठी ग्राहक स्वत: खरेदीसाठी येतात. कच्च्या मालाचे दर स्थिर असल्याने यंदाही भाव फारसे वाढलेले नाहीत.

मखर (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

हार,फुलांमधील बदलत्या ट्रेंड विषयी

टी. के. फ्लॉवर्सचे तेजस खुराना यांनी अधिक माहिती दिली, फुलांची तोरणे, माळा हार-रांगोळी यांसारख्या सजावटीच्या साहित्यांना कायमच मागणी राहणार आहे. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे झेंडू, गुलाब, कमळ या पारंपारिक फुलांबरोबरच ग्राहक शोभिवंत फुलांनाही चांगला प्रतिसाद देत आहेत. यातील बरीच उत्पादने चीनमधील असली, तरी आपल्याकडील मोत्यांच्या सजावटींनाही चांगली मागणी आहे.

याविषयी बोलताना पर्यावरण कार्यकर्त्या शैलजा देशपांडे म्हणाल्या की, सजावटीच्या बाजारपेठेमध्ये प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. यावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी. मात्र, त्यासाठी सरकारने आधी पर्याय उपलब्ध करून द्यायला हवेत. पर्याय मिळाले, तर नागरिक आपोआपच प्लास्टिक वापरणे बंद करतील.