पुणे : वैभवशाली म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल साडेतेहेतीस तास रेंगाळली. पूर्ण उत्सवात गर्दीने उच्चांक गाठला. पण, त्यामुळे रोजच रात्री मध्यवर्ती भागांत वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यात, अनंत चतुदर्शीचा दुसरा पूर्ण दिवस प्रमुख रस्ते बंद राहिल्याने नागरिकांचा मोठा खोळंबा झाला. दुसरीकडे, उत्सवात काहीसा लगाम लागलेला ‘आव्वाज’ विसर्जन मिरवणुकीत मात्र मर्यादा ओलांडून बराच काळ घुमला.
वास्तविक यंदा मिरवणुकीचा वेग वाढविण्यासाठी पोलिसांचे धक्का पथक नेमण्यात आले होते. मात्र, मिरवणुकीचा वेग वाढविण्यात पथकास अपयश आले. विशेषत: रात्री बाराला ध्वनिवर्धक बंद झाल्यानंतर दोन मंडळांत बरेच अंतर पडत गेले. ध्वनिवर्धक बंद झाले, तरी ढोल-ताशा पथकांचे वादन सुरू राहिले. त्याचप्रमाणे, टिळक चौकात मंडळांना सूचना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या पोलीस आणि महापालिकेच्या स्वागत कक्षांतील ध्वनिक्षेपक यंत्रणाही बारानंतर सुरू होती.
काही गणेश मंडळे यंदा मध्येच मिरवणुकीत सहभागी झाली. त्यामुळे अखिल मंडई मंडळासह इतर काही मंडळांना मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अधिक विलंब झाल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली. शनिवारी सकाळी सहानंतर ध्वनिवर्धक पुन्हा सुरू झाल्याने रस्त्यावरील गर्दीत वाढ झाली. याचा परिणाम शनिवारीही जाणवला. मध्यवर्ती भागासह डेक्कन जिमखाना परिसरातील रस्ते, गल्ल्या सायंकाळी उशिरापर्यंत बंद राहिल्या. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
यंदाच्या गणेशोत्सवात जवळपास रोजच रात्री देखावे पाहण्यासाठी अमाप गर्दी उसळली. ‘व्हायरल’ होणारे देखाव्यांचे ‘रील्स’ हे त्याचे एक कारण होते. तसेच, गौरी-गणपती विसर्जनानंतर शनिवार-रविवार आल्याने अनेकजण उत्साहाने बाहेर पडले. गेल्या काही वर्षांत उत्सवाच्या काळात बाहेरून पुण्यात येणाऱ्यांचे प्रमाणही वाढताना दिसते. त्याचाही परिणाम जाणवला. त्याचप्रमाणे, मेट्रोने मध्यवर्ती भागांत येणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. या सोयीमुळेही गर्दीत वाढ झाली.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही गर्दी व्यवस्थापनाला प्राधान्य दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘मिरवणुकीचा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण, मिरवणूक पाहण्यासाठी लाखो भाविक मध्य भागात गर्दी करतात. विसर्जन मार्ग अरुंद आहे. अशा परिस्थितीत मंडळ लवकर मार्गस्थ करणे किंवा मिरवणुकीचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केल्यास चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. गोंधळही उडू शकतो. अशा परिस्थितीत मिरवणुकीच्या वेळेपेक्षा भाविक, कार्यकर्त्यांची सुरक्षा महत्त्वाची ठरते.’
ध्वनिमर्यादा उल्लंघनावर कारवाई
ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. अशा मंडळाच्या ध्वनियंत्रणेची तपासणी करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.
