पुणे : गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. मात्र विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांनी तयार केलेले देखाव्यांचे रथ आणि मांडव अद्यापही हटविण्यात आलेले नाहीत. उत्सव संपला तरी रस्त्यांवरील अडथळे हटविण्याचे भान मंडळांना तसेच महापालिकेला न राहिल्याने अरुंद रस्त्यांमुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.

शहरातील अनेक मंडळांचे देखाव्यांचे रथ अद्यापही रस्त्याच्या कडेलाच उभे असल्याने वाहतुकीसाठी रस्ता कमी पडत असून महापालिका प्रशासनदेखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने वाहनचालकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात महापालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून गणेश मंडळांना मांडव, कमानी, देखावे तसेच मिरवणुकीसाठी रथ उभारण्याची परवानगी दिली जाते. उत्सव संपल्यानंतर संबंधित साहित्य तातडीने हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात विसर्जन मिरवणूक संपल्यानंतरही अनेक ठिकाणी रथ आणि मांडवांचा ‘मुक्काम’ शहरातील रस्त्यांवर कायम आहे. त्यामुळे अरुंद झालेल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून पादचारी आणि वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

आता नवरात्रोत्सव आला आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत मंडळांकडून मांडव उभारण्यास सुरुवात होईल. नवरात्रोत्सवादरम्यान मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांसाठी पुन्हा रस्त्यांचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी नव्याने रथ, देखावे आणि मंडप उभारले जाण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतरचे रथ आणि मांडव हटविले नाहीत आणि त्यातच नवरात्रोत्सवाचे साहित्य रस्त्यावर आले, तर शहरातील वाहतुकीची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

उत्सवाच्या काळात वाहतूक व्यवस्थेसाठी महापालिका तसेच पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरते. मात्र उत्सव संपल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी नक्की कोणाची? याबाबत स्पष्टता नाही. उत्सव संपून दहा ते अकरा दिवस उलटल्यानंतरही मंडळांचे रथ रस्त्यावरच उभे आहेत. विशेष म्हणजे पोलीस तसेच महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना हे दिसत कसे नाहीत? असा प्रश्न विचारला जात आहे.

मंडळांना राजकीय वरदहस्त?

उत्सवासाठी परवानगी देताना महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून विविध अटी घातल्या जातात. मात्र उत्सव संपल्यानंतर त्या अटींची अंमलबजावणी होते का, याची तपासणी कोण करणार? रस्ते अडवून ठेवणाऱ्या मंडळांवर कारवाई कोण करणार? बहुतांश मंडळातील पदाधिकारी हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्यांना सांगणार कोण? वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यांवर असलेले रथ आणि मांडव हटविण्याची जबाबदारी कोणी घेत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

शहरातील रस्त्यांवर मिरवणूक रथ तसेच मांडव अद्यापपर्यंत न काढलेल्या मंडळांना तातडीने हे रथ काढून घेण्यासाठी प्रत्येक वर्षी ठरावीक मुदत दिली पाहिजे. या मुदतीनंतर मंडळाचे साहित्य रस्त्यावर राहिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. पोलिसांनीही वाहतुकीला अडथळा ठरणारे रथ, मांडव हटविण्यासाठी महापालिकेशी समन्वय साधावा. अन्यथा ‘उत्सव संपतो, पण रस्त्यावरील अडथळे संपत नाहीत’ अशी पुणेकरांची अवस्था कायम राहणार आहे.