राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ‘श्रीं’च्या विसर्जनाचा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.  रविवारी सकाळी सुरू झालेला विसर्जन सोहळा तब्बल २३ तास ३० मिनिटांच्या कालावधीनंतर सोमवारी दुपारी पूर्ण झाला. पुण्यातील महाभारत मित्र मंडळाच्या बाप्पाचे सर्वात शेवटी विसर्जन झाले. सालाबादप्रमाणे यंदाही विविध गणेश मंडळांचे आकर्षक सजावट केलेले रथ पुण्यातील मिरवणूक सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. अखिल मंडई मंडळ, भाऊसाहेब रंगारी गणपती , जिलब्या मारूती आणि दगडुशेठ हलवाई गणपती या मंडळाचे डोळ्याचे पारणे फेडणारे हे रथ पाहण्यासाठी पुण्यातील रस्त्यांवर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. या मिरवणूक सोहळ्यात पुण्याच्या पारंपरिक संस्कृतीबरोबरच काही नवीन पायंडे पडताना दिसले. विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच गजानन मंडळ आणि गरूड गणपती मंडळाने त्यांच्या गणपतींची संयुक्त मिरवणूक काढली. दोन्ही मंडळांच्या या स्तुत्य उपक्रमाचे भविष्यात पुण्यातील इतर मंडळांकडूनही अनुकरण केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरवणुकांतील ध्वनीप्रदुषण नियमांच्या उल्लंघनाचा भाग वगळता एकुणच हा संपूर्ण सोहळा वाखाणण्याजोगा राहिला.
तत्पूर्वी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी दुष्काळाच्या परिस्थितीचे सामाजिक भान दाखवत गणेशमुर्तींचे विसर्जन हौदात केले. मानाचा पहिला गणपती असणारा श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीने रविवारी साधारण दुपारी चारच्या सुमारास पुण्यातील विसर्जन सोहळ्याची सुरूवात झाली. दुपारी पाच वाजता श्री तांबडी जोगेश्वरी या मानाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि केसरीवाडा मंडळाच्या गणपती विसर्जनासह संध्याकाळी सात वाजता मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा संपन्न झाला.
मानाच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जन सोहळ्याचे आकर्षण केंद्र असलेल्या अखिल मंडई मंडळ, भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, बाबू गेनू मंडळ, जिलब्या मारूती आणि दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला. या गणेश मंडळांचे मिरवणूक रथ पाहण्यासाठी शहरातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता हे महत्त्वाचे मार्ग गर्दीने फुलून गेले होते. परंतु, मिरवणुकीतील ढोल-ताशांचा ढणढणाट आणि डीजेचा आवाज न्यायालयाने आखून दिलेल्या ध्वनीप्रदुषणाच्या मर्यादा ओलांडताना दिसला. मात्र, पोलिसांनी हे रोखण्यासाठी कुठेही ठोस भूमिका घेतलेली दिसली नाही. दरम्यान, सकाळाच्या वेळेत पावसाने पाठ फिरवल्याने पुणेकरांना कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. मात्र, तरीही पुणेकरांच्या उत्साहात तसूभरही फरक पडला नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* आकर्षक रोषणाईने नटलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा रथ.

* गणेश विश्वदीप रथावर विराजमान झालेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

* पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन गणेश मंडळांच्या गणपतींची संयुक्त मिरवणूक
* गजानन मंडळ आणि गरूड गणपती मंडळांची संयुक्त मिरवणूक

* लक्ष्मी रोडवरील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा गणपती

* जगदीश चित्ररथावरून मिरवणूक काढण्यात आलेली जिलब्या मारूती मंडळाची देखणी गणेशमूर्ती. मंडळासाठी यापूर्वी चित्ररथाची सजावट करणाऱ्या दिवंगत जीवन रणबीर यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी रथाचे नामकरण जीवन रथ असे करण्यात आले होते.

* लक्ष्मी रोड अखिल मंडई मंडळाच्या गणपतीची  स्वराज्य रथावरून थाटात काढण्यात आलेली मिरवणूक.

* लक्ष्मी रोड श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाची मोहक गणेशमूर्ती.

*लक्ष्मी रोड वीर हनुमान मंडळाच्या गणपती मिरवणुकीच्या रथावर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या शिलेदरांची माहिती देणारा आकर्षक देखावा साकारण्यात आला होता.

*  लक्ष्मी रोड माती गणपती मंडळाची आकर्षक मिरवणूक. या मिरवणुकीसाठी मंडळाने सध्या चर्चेत असलेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटावर आधारित ‘महिश्मतीदेवी बाहुबली’ हा चित्ररथ तयार केला होता.

* टिळक रोड खजिना विहीर तरूण मंडळाच्या गणपतीची मिरवणूक

*  ब्रह्म रथात विराजमान झालेला टिळक रोड छत्रपती शिवाजी मार्केट यार्डाचा गणपती
*  शिव मल्हार रथावरील साने गुरुजी तरुण मंडळाचा गणपती.

* गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

* मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती मंडळाचा फुलांनी सजविण्यात आलेला रथ.


* मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची चांदीच्या पालखीतून शाही मिरवणूक.


* पुण्यातील पहिला मानाचा कसबा गणपती

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ganesh visarjan
First published on: 27-09-2015 at 10:40 IST