यंदाही विसर्जन मिरवणूक लांबली असून, गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला ३२ तास २६ मिनिटे वेळ लागला होता. शनिवारी दुपारनंतर लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक सुरू आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीला किती वेळ लागणार याकडे सामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या मंडळाचे विसर्जन शुक्रवारी सायंकाळी झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. रात्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या श्रींचे विसर्जन झाले. त्यानंतर अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, जिलब्या मारुती मंडळ, हुतात्मा बाबू गेणू मंडळ ही मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास मध्यरात्र झाली.
बेलबाग चौकातून ही मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील मंडळे लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली. रात्री विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या बहुतांश मंडळांनी ध्वनीक्षेपक यंत्रणेचा वापर केला होता. रात्री बाराच्या सुमारास ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद झाल्यानंतर मिरवणूक संथगतीने सुरू होते. शुक्रवारी सहाच्या सुमारास पुन्हा ध्वनीक्षेपक सुरू करण्यात आले. त्यानंतर अनेक मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली.
केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावरील मिरवणूक दुपारनंतर सुरू होती. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला ३२ तास २६ मिनिटे मिरवणूक सुरू होते. गेल्या वर्षी सायंकाळी सहाच्या सुमारास शेवटच्या मंडळाच्या ‘श्रीं’चे विसर्जन झाले. यंदाही विसर्जन मिरवणूक संपण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.
विसर्जन मिरवणुकांना लागलेला वेळ
वर्ष वेळ
२०१६ – २८ तास ३० मिनिटे
२०१७- २८ तास ०५ मिनिटे
२०१८- २७ तास १५ मिनिटे
२०१९ – २४ तास
२०२० -करोनामुळे मिरवणूक नाही
२०२१ – मिरवणूक नाही
२०२२ – ३१ तास
२०२३ – २८ तास ४० मिनिटे
२०२४ – २८ तास ३० मिनिटे
२०२५ – ३२ तास २६ मिनिटे
पोलिसांचे नियोजन कागदावरच
गणेशोत्सवापूर्वी पोलिसांकडून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सूचना केल्या होत्या. यंदा ध्वनीप्रदूषणाबाबत विद्यानंद बापट यांनी भूमिका घेतली. यापार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक लवकर आटोपणे, तसेच ध्वनीक्षेपकांचा वापराबाबत पोलिसांनी नियमावली केली होती. मात्र, विसर्जन मिरवणुक संथगतीने सुरू होती. पोलिसांचे नियोजन कागदावरच राहिले. रात्री बारानंतर विसर्जन मिरवणुकीतील मंडळांमध्ये अंतर पडले. ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद झाल्यानंतनर अनेक मंडळे जागेवरच थांबली.
लक्ष्मी रस्त्यावर काही मंडळांचा शिरण्याचा प्रयत्न
गेल्या वर्षी १६ मंडळांनी ठरवून दिलेला विसर्जन मार्ग सोडून लक्ष्मी रस्त्यावर प्रवेश केल्याने पोलिसांनी मंडळांना नोटिसा बजाविल्या होत्या. यंदा ठरवून दिलेला मार्ग सोडून मंडळे मुख्य मिरवणुकीत शिरणार नाहीत, याची काळजी घेण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र, यंदाही काही मंडळांनी लक्ष्मी रस्त्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विसर्जन मार्गावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
