पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवरील खड्डे, नादुरुस्त पदपथ, उंचसखल चेंबर आणि खोदाईनंतरची अपूर्ण राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले. प्रलंबित सर्व कामे येत्या दोन दिवसांत पूर्ण करून जिओ-टॅग्ड छायाचित्रांसह सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी सकाळी सात वाजल्यापासून बेलबाग चौक ते अलका टॉकीज, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, मंडई परिसर, केळकर रस्ता आणि कुमठेकर मार्ग या प्रमुख विसर्जन मिरवणूक मार्गांची पाहणी केली. यामध्ये मिरवणूक मार्गावरील अनेक कामे प्रलंबित असल्याचे समोर आले. गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने दिवटे यांनी नाराजी व्यक्त केली.
महापौर, महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या बैठकीत रस्ते दुरुस्ती आणि चेंबर दुरुस्ती तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधितांना आदेश देण्यात आले. मात्र, पाहणीत अनेक कामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दिवटे यांनी ही कामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचा आदेश दिला. पाहणीच्या वेळी पथ विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता राजेश बनकर, अधीक्षक अभियंता गव्हाणे उपस्थित होते. वारंवार सूचना करून देखील कामे होत नसल्याने नगरसेवक आणि नागरिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. याकडे गांभीर्याने पहावे असे अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी सांगितले.
मिरवणूक मार्गावरील नादुरुस्त, उंच-सखल आणि ब्लॉक्स निघालेले पदपथ तातडीने दुरुस्त करून समतल व सुरक्षित करण्याच्या सूचना दिवटे यांनी केल्या. गेल्या वर्षी सायकल ग्रँड टूरअंतर्गत करण्यात आलेल्या पदपथ दुरुस्ती, रंगकाम आणि अन्य कामांतील त्रुटी दोषदायित्व कालावधीत संबंधित कंत्राटदारांकडून दुरुस्त करून घ्याव्यात, महावितरण, तसेच अन्य संस्थांनी केलेल्या खोदाईनंतर रस्ते आणि पदपथ पूर्ववत करण्याचे काम मानक कार्यपद्धतीनुसार (एसओपी) झाले नसल्यास संबंधित संस्थांकडून ते तातडीने करून घेण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.
निकृष्ट कामांवर दंडात्मक कारवाई
खड्डे बुजविताना काम मानक कार्यपद्धतीनुसार (एसओपी) करून घ्यावे. वारंवार सूचना देऊनदेखील निकृष्ट किंवा अपूर्ण कामे आढळल्यास कंत्राटदारांवर करारातील अटी व प्रचलित नियमांनुसार दंडात्मक कारवाई करावी. कामातील हलगर्जीपणासाठी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केल्या.
