पुणे : यंदा तुकाराम मुंढेंच्या भेसळविरोधी मोहिमेने अन्न-प्रशासन ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया आहे. अजूनही अपंगांचे प्रश्न तसेच आहेत. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतही या साऱ्याची छटा पाहायला मिळाली.

याबरोबरच महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग, मतिमंद, शेतकरी, वारकरी सगळेच एका अनामिक ओढीने मिरवणुकीतल्या उत्साहात सहभागी झाले. सर्वांनी समरसतेची हाक दिली. आपापल्या समस्येचा प्रत्येकाला विसर पडला होता. पथकांमधील ज्येष्ठांनीही समस्यांच्या ‘बेड्या विसर, तू नाच’ अशी भावना ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश. रथावर नगारा आणि चौघड्याचे वादन. ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाच्या गणपतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली. बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी ‘नशामुक्त भारत अभियानां’तर्गत जनजागृती करणारे संदेश या मिरवणुकीत दिले. यात ‘कामयानी’ वाद्य पथकाने लक्ष वेधून घेतले. अपंग-मतीमंद मुलांची दिंडी मानाच्या गणपतीमागे. त्यामागे अन्न व प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नभेसळी विरोधात सुरू केलेली मोहीम. या मोहिमेच्या समर्थनात असलेले फलक लक्ष वेधून घेत होते.

यंदा मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होरपळ होत आहे, तर जनावरांच्या खाण्याची आबाळ. हिरवा चारा करपून गेला आहे. या दुष्काळातून सुटका कर. कृपेचा पाऊस पडू दे, अशा आशयाचा फलक ‘कामयानी’ने साकारला आहे.

‘विकसित भारत आणि विकसित भारतचे युवा’

प्रत्येक पथक काही ना काही वेगळे करण्याचा प्रयत्न करते. यंदा ‘स्व-रूपवर्धिनी’ने परंपरा आणि विकास हातात हात घालून पुढे जाऊ शकतो, अशा आशयाचे वैविध्यपूर्ण सादरीकरण केले. मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीमागे ‘स्व-रूपवर्धिनी’चे पथक आहे. ‘विकसित भारत आणि विकसित भारतचे युवा’ या संकल्पनेवर सादरीकरण करत असल्याचे पथकातील जुने कार्यकर्ते अरविंद केळकर सांगतात. ते म्हणाले, ‘विकसित भारतासाठी युवकांचा विकास आवश्यक आहे. हाच संदेश यंदाच्या मिरवणुकीतून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दरवर्षीप्रमाणे मल्लखांब, गेल्या वर्षीपासून सुरू केलेले सोलापुरी ठेक्यावरील लेझीम पथक आणि ढोल-ताशा वादनाचा पथकात समावेश करण्यात आला आहे.’