पुणे : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून उत्सवात वापरल्या जाणाऱ्या डीजे, लेझर लाईट वरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेत तसेच राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचीका काही पदाधिकाऱ्यांनी स्पीकर्स वापरण्यास हरकत काय ? अशी भूमिका घेतली आहे.
भाजपच्या राज्यसभेच्या खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी देखील उत्सवाच्या काळात डीजे, लेझर लाईटच्या वापराबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ‘डीजे तसेच लेझरमुक्त गणेशोत्सवाचा ‘पुणे पॅटर्न’ तयार करावा. कोणत्याही जाती-धर्माचा सण, उत्सव असला, तरी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी. डीजे, प्लाझ्मा, लेझर लाईटसारख्या गोष्टींवर पूर्णपणे बंदी आणावी,’ अशी अपेक्षा भाजपच्या खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
‘उत्सवाच्या नावाखाली अर्धनग्न अवस्थेमध्ये महिला दहीहंडीसाठी येऊन अंगविक्षेप करीत असतील, तर हे श्रीकृष्णाला आणि गणेशोत्सवात श्री गणरायाला आवडेल का? याचा विचार गणेश मंडळांनी, कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी करायला हवा,’ असेही खासदार मेधा कुलकर्णी यांनी सुनावले. ‘डीजे, गोंगाट आणि उत्सवाला गालबोट लावणाऱ्या गोष्टींच्या विरोधात गेले अनेक वर्षांपासून भूमिका मांडत आले आहे. त्यामुळे केवळ गणेशोत्सव नाही, तर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही डीजेचा दणदणाट बंद व्हावा, असे वाटते,’ असे त्या म्हणाल्या.
‘सण-उत्सवांच्या काळात वाजणाऱ्या कर्णकर्कश डीजेमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक, उच्च रक्तदाब व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना तीव्र त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे उत्सव साजरा करत असताना या सर्व गोष्टींचा निश्चितपणे विचार झाला पाहिजे,’ असे त्या म्हणाल्या. ‘गणेश मंडळांनी उत्सवाच्या काळात गुटख्याच्या किंवा आरोग्यास घातक असणाऱ्या उत्पादनांच्या छुप्या जाहिराती स्वीकारू नयेत,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गणेशोत्सवात काही जागरूक नागरिकांनी मांडलेली भूमिका समाजाच्या हिताची आहे. ते आस्तिक आहेत, की नास्तिक आहेत, याच्याशी संबंध जोडता कामा नये. गणेश मंडळांनी पुणेकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही राज्यसभेच्या खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
पुणे महापालिकेच्या बैठकीत गोंधळ
पुणे महापालिकेने गेल्या आठवड्यात गणेशोत्सव २०२६ च्या पूर्वतयारीसाठी महानगरपालिकेत बैठक बोलाविली होती. या बैठकीसाठी शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्त्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या वापराचा मुद्दा चांगलाच गाजला.
नारायण पेठेतील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवात डीजे आणि मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली. बापट यांनी घेतलेल्या भूमिकेला गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर उत्सवाच्या काळात डीजे, प्लाझ्मा, कर्णकर्कश आवाजातील स्पीकर्स यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
