पुणे : गणेशोत्सवाचे वेध लागताच सजावटीचे साहित्य, अलंकार-दागिने, देखाव्यांसाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारात लगबग वाढते. यंदा गणरायाच्या आगमनापूर्वी मूर्ती, त्यावरील पोशाख, दागिने आणि सजावटीच्या साहित्य निवडीसाठी ‘एआय’ची मदत घेण्यात येत आहेत.घरातील गणेशोत्सवासाठी थीम निवडून त्याआधारे बाजारातील गणेशमूर्तींचे नियोजन केले जात आहे. आवडलेल्या गणेशमूर्तीवर कोणती वस्त्रे शोभून दिसतील, कोणती पगडी उठून दिसेल, त्यांची रंगसंगती ते सजावटीसाठी काय करता येईल इत्यादी गोष्टींसाठी नागरिक थेट ‘एआय’ची मदत घेत आहेत.
मूर्तीचा फोटो किंवा सजावटीच्या कल्पनांची माहिती ‘एआय’ला दिली जाते. त्यानुसार कोणत्या प्रकारचे साहित्य निवडायचे, पोशाख-दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार मूर्तीवर कसे दिसतील, हे पाहिले जाते. त्यानुसार ‘एआय’ने बनवलेले छायाचित्र बाजारात दाखवून वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करण्यात येत असल्याची माहिती बाजारातील विक्रेत्यांनी दिली. ग्राहकांकडून पारंपारिक वस्तू-साहित्यालाच पसंती देण्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले. कसबा पेठेतील व्यावसायिक आनंद महाडिक म्हणाले, ‘आता ‘एआय’चा काळ आहे.
नागरिक आपल्या गणेशमूर्तीचे छायाचित्र ‘एआय’ला देतात. मूर्तीला कुठली ड्रेपरी, फेटा किंवा रंगसंगती शोभून दिसेल, ते विचारतात. त्यानुसार ‘एआय’ने सुचवलेले छायाचित्र आणि डिझाईन घेऊन ग्राहक त्याच प्रकारचे फेटे-धोतर बनवून देण्याची मागणी करतात.’ ‘ग्राहकांकडून पारंपरिक पोशाखांचीच मागणी केली जाते. आमच्याकडून गणेशमूर्तीचा आकार, बैठक आणि प्रकारांनुसार त्यांना वेगवेगळे पर्याय सुचवले जातात किंवा त्यांनी दाखवलेल्या छायाचित्रातील पोशाख-सजावटीबद्दल मार्गदर्शन केले जाते. यंदा अनेक ग्राहकांकडून कृष्ण पगडीची मोठी मागणी करण्यात येत आहे. मूर्ती रूबाबदार दिसण्याकडे अनेकांचा कल आहे,’ असेही महाडिक यांनी सांगितले.
मूर्तीच्या सजावटीबरोबरच नागरिकांकडून देखाव्यांची मोठी मागणी करण्यात येत आहे. गेल्या २५-३० वर्षांपासून नरेश वूड आर्टिकल्सच्या माध्यमातून पुण्यात देखाव्यांसाठी लाकडावरील नक्षीकामाचा व्यवसाय करणारे नरेश बडाई म्हणाले, ‘यंदा प्लायवूडवरील नक्षीकामाला मोठा मागणी आहे. अनेकजण ‘एआय’ने बनवलेली छायाचित्रे दाखवतात. पण, नेहमीच्या सिंहासन, शंकर, हनुमान किंवा पांडुरंग आदी नक्षीकामांना मागणी आहे. त्याबरोबर अष्टविनायक संकल्पनेतील वूडन आर्टिकल्स आणि डिझाईन्सना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती देण्यात येत आहे.’
दरम्यान, ‘ग्राहक आपल्या आवडीनुसार ‘एआय’ तंत्रज्ञान अथवा नव्या डिझाईन्सचा वापर करत असले, तरी उत्सवाचे मूळ स्वरूप, आस्था आणि पारंपरिकता कायम ठेवण्यासाठी ग्राहक आणि विक्रेत्यांकडूनही प्रयत्न करण्यात येत आहे. गणेशोत्सवाचे १० दिवस घरात येणाऱ्या गणरायाचे रूप अधिकाधिक मनमोहक असावे, या उद्देशाने हा नवा ट्रेंड आहे,’ असे महाडिक यांनी नमूद केले.
