पुणे : ढोल-ताशांचा निनाद करीत भगवे ध्वज नाचविणारे युवक-युवती, बँडपथकांनी सादर केलेल्या सुरेल सुरावटी, ‘मोरया’चा गजर आणि सळसळत्या तरुणाईचा जल्लोष अशा उत्साही वातावरणात सोमवारी उत्सवाचा ‘श्रीगणेशा’ झाला. मानाच्या गणपती मंडळांच्या गणरायाची विधिवत पूजा करून मुहुर्तावर प्रतिष्ठापना करण्यात आली. शहराच्या मध्यभागात मिरवणुकांमुळे जणू गणेशभक्तांच्या गर्दीचा पूर आला होता. ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकांच्या सुरावटी आणि त्या तालावर निघणाऱ्या मिरवणुकांनी झालेले उत्साही वातावरण बारा दिवस अनुभवता येणार असल्याची नांदी प्रतिष्ठापना मिरवणुकांनी दिली. रात्री उशिरापर्यंत शहर आणि उपनगरांतील मंडळांच्या प्रतिष्ठापना मिरवणुका सुरू होत्या.
सर्वांना आतुरता असलेल्या गणेशोत्सवाची सोमवारी सुरुवात झाली. एक महिना उशिरा आला असला तरी यंदा गणेशोत्सव बारा दिवसांचा असल्याने लाडक्या गणरायाच्या चरणी लीन होण्याच्या संधीमध्ये तिथीवृद्धीने वाढ झाली आहे. रविवारी आणून ठेवलेल्या गणेशमूर्तीची घरोघरी विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. घरातील पूजा झाल्यानंतर युवक-युवती ढोल-ताशा पथकातील वादन सेवेसाठी सज्ज झाले. मिरवणुकीमध्ये वादन करून गणरायाच्या चरणी सेवा अर्पण करताना त्यांच्यामध्ये ऊर्जा संचारली होती. भगवे ध्वज नाचवीत, ढोल आणि झांजावादनामध्ये मुलांच्या बरोबरीने योगदान देत युवतींनी मिरवणुका पाहणाऱ्या पुणेकरांना तालावर खिळवून ठेवले. वादन झाल्यानंतर थकलेल्या तरुणाईने घर गाठून कुटुंबीयांसमवेत उकडीचे मोदक आणि पंचखाद्यासह सुग्रास भोजन करून आनंद द्विगुणित केला.
श्री कसबा गणपती मंडळ
ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक सकाळी सव्वाआठ वाजता उत्सव मंडपातून सुरू झाली. मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांच्या रास्ता पेठेतील कलानिकेतन स्टुडिओ येथून घेतलेली गणरायाची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये विराजमान करून ही मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचली. प्रभात बँड, संघर्ष ढोल-ताशा पथक, ज्ञानप्रबोधिनी युवक विभाग, शौर्य ढोल-ताशा पथक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. वाराणसी येथील सांगवेद विद्यापीठात ‘दंडक्रम पारायण’ यशस्वीरीत्या पूर्ण केलेले १९ वर्षीय वेदमूर्ती देवव्रत रेखे यांच्या हस्ते सकाळी पावणेबारा वाजता श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ
मानाचा दुसरा ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची मिरवणूक चांदीच्या पालखीतून सकाळी दहा वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील मंदार लाॅज येथून सुरू झाली. या मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, ताल ढोल-ताशा पथक, विष्णूनाद शंख पथक सहभागी झाले होते. कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, आप्पा बळवंत चौक मार्गे मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचल्यानंतर आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे विश्वस्त योगी निरंजननाथ गुरू शांतिनाथ यांच्या हस्ते दुपारी सव्वाबारा वाजता श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाने साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
श्री गुरुजी तालीम मंडळ
श्री गुरुजी तालीम मंडळ या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी अकरा वाजता गुरुजी तालीम गणपती मंदिरापासून निघणार आहे. स्वप्निल आणि सुभाष सरपाले या बंधूंनी साकारलेल्या फुलांच्या आकर्षक रथातून निघालेल्या या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँडपथक, गुरुजी प्रतिष्ठान, शिवतेज, शिवरुद्र, शिव ताल, रुद्रतेज, कलावंत ही ढोल-ताशा पथके सहभागी झाली होती. गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौकमार्गे मिरवणूक उत्सव मंडपात आल्यानंतर दुपारी एक वाजून ५५ मिनिटांनी उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
श्री तुळशीबाग मंडळ
मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे आगमन रविवारीच उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते उत्सव मंडपात झाले. सोमवारी सकाळी नऊ वाजता गणपती मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक गणपती चौक, लक्ष्मी रस्ता, नगरकर तालीम चौक, बाजीराव रस्ता, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी गणपती, मजूर अड्डा चौक, बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे उत्सव मंडपात आली. अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
केसरीवाडा गणेशोत्सव
केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचव्या गणपतीची मिरवणूक सकाळी नऊ वाजता रमणबाग चौकातून प्रथेप्रमाणे पालखीतून सुरू झाली बिडवे बंधू यांचा सनई-चौघडावादनाचा गाडा, श्रीराम पथक आणि कलावंत ढोल-ताशा पथकांचा समावेश असेल. शिंदे पार चौक, ओंकारेश्वर मंदिर, वर्तक उद्यान, नारायण पेठ पोलीस चौकी, न. चिं. केळकर रस्त्याने मिरवणूक उत्सव मांडवात दाखल झाल्यावर रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते पावणेबारा वाजता गणरायाची प्रतिष्ठापना झाली. वेदमूर्ती कौस्तुभ खळीकर यांनी पौराहित्य केले.
अखिल मंडई मंडळ
फुलांनी सजविलेल्या भव्य पुष्परथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची मिरवणूक सकाळी दहा वाजता सुरू झाली. अखिल मंडई मंडळाचे समाज मंदिर, मंडई पोलीस चौकी, रामेश्वर चौक, गोटीराम भैया चौक, मेट्रो स्टेशन मार्गे मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचली. न्यू गंधर्व बँडपथक, समर्थ आणि तालचक्र ढोल-ताशा पथक मिरवणुकीत सहभागी झाली होती. मंडळाने साकारलेल्या हरिहर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये डॉ. विनय थोरात आणि प्रतिभा थोरात यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता शारदा-गजाननाची प्रतिष्ठापना झाली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून सकाळी साडेआठ वाजता गणपती मंदिरापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक सुरू झाली. आप्पा बळवंत चौक, लिंबराज महाराज चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे मिरवणूक उत्सव मंडपात आली. गंधाक्ष ढोल-ताशा पथक, मयूर बँड, प्रभात बँड आणि दरबार बँड मिरवणुकीत सहभागी झाले होते. उत्तर प्रदेश वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
