पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच पुणे शहरात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान शनिवारवाडा येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.
अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे महोत्सवाचे संयोजक, भाजपचे आमदार हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा, सांस्कृतिक वैभव आणि लोककलेचा वारसा राज्यभर पोहोचविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘पंढरपूरच्या वारीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनाकडून विशेष नियोजन केले जाते. त्याच धर्तीवर गणेशोत्सवाच्या कालावधीत पुण्यात येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य आणि इतर आवश्यक सुविधा द्यावी,’ अशी मागणी रासने यांनी केली.
‘सर्वांनीच नियम पाळणे गरजेचे’
‘गणेशोत्सवात नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी सर्व गणेशमंडळांनी घेणे गरजेचे आहे. आवाजाच्या मर्यादेचे पालन करायला हवे. गेल्या काही वर्षांत पोलीस प्रशासन, गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयामुळे ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. आता ढोल-ताशा पथकांनीही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे,’ असेही हेमंत रासने यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे वेळापत्रक
– १६ सप्टेंबर : सायंकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत पारंपरिक ढोल-ताशा पथकांचा ‘नादविष्कार’ हा कार्यक्रम असणार आहे. त्यामध्ये ज्ञानप्रबोधनीच्या शालेय विद्यार्थ्यांचे पथक, स्वरूपवर्धिनीचे पूर्व भागातील विद्यार्थ्यांचे पथक, तेजस्विनी हे महिलांचे झांज पथक, से नो टू ड्रग्सची प्रतिज्ञा घेणारे शिवमुद्रा पथक सादरीकरण करणार आहेत.
– १७ सप्टेंबर : सायंकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत ‘कणक – अक्षर अक्षर तुझेच आहे’ या विशेष काव्य सादरीकरण कार्यक्रम. – १८ सप्टेंबर : लोककला, लोकसंगीत आणि लोकपरंपरांचा आविष्कार घडविणाऱ्या ‘फोक-लोक : महाराष्ट्राच्या लोककलेचा जल्लोष’ कार्यक्रम.
