पुणे : पुणे शहरात यंदाच्या गणेशोत्सवात गणेश मंडपांमधील देखाव्यांचा कल बदलल्याचे चित्र आहे. ऐतिहासिक किंवा सामाजिक विषयांबरोबरच चिमुकल्यांच्या आवडीचे गोरीला आणि जंगल, भूतबंगला, कॅण्डीबंगला, अलिबाबा अन् चाळीस चोर, तुंबाड अशा कल्पनारम्य देखाव्यांनी बालगोपाळांना भुरळ घातली आहे. या देखाव्यांसमोर समाज माध्यमांवर रील्समुळे रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येते.
उदय मंडळ ट्रस्टचा गोरीला आणि जंगल, डेक्कन जिमखानामधील श्रीकृष्ण मंडळाचा कॅॅण्डी लॅँण्ड, सोमवार पेठेतील अपोलो तरुण मंडळाचा अवतार या ॲनिमेशन चित्रपटावर आधारित अवतार देखावा, दांडेकर पुलाजवळील वाघजाई माता मित्र मंडळाचा भूतबंगला तर लालमहालजवळील जिजामाता मित्र मंडळ यांचा तुंबाड, नारायण पेठेतील मुंजोबाचा बोळ तरुण मित्र मंडळाचा चल रे भोपळ्या टुणुक टुणुक आणि माकडांचे काळीज हे शहरातील देखावे लहान मुलांच्या आकर्षणाचे केद्रबिंदू ठरत आहेत. भरत मित्र मंडळ गेल्या दहा वर्षापासून लहान मुलांचे देखावे बनवत आहेत. यंदा त्यांनी अलीबाबा आणि चाळीस चोर हा देखावा साकारला आहे. उदय मंडळ ट्रस्टने सलग दुसऱ्यांदा लहान मुलांना पसंतीस उतरेल, असा देखावा सादर केला आहे. गोरीला आणि जंगल हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
मोठ्ठ्या मोठ्ठ्या कँडी, चॉकलेट्स, डोनट्स, आइस्क्रीम, बिस्किटे आणि कॅडबरी पाहून मला खूपच मजा आली. सगळीकडे एवढ्या गोड गोड गोष्टी होत्या की, मला तिथून परतच जावेसे वाटत नव्हते, मंडळाने मला फ्रुट कँडी पण दिली, अशी प्रतिक्रिया नऊ वर्षांच्या मीरा शहा हिने दिली.
लहान मुलांना खेळायला मैदाने नाहीत. शहरात जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत, हा विचार करून ‘गोरीला आणि जंगल’ हा देखावा तयार केला आहे. या देखाव्यातून मुलांना जंगलचा अनुभव घेता येत आहे. अशी माहिती उदय मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विलास कथाऴकर यांनी दिली.
नारायण पेठेतील भरत मित्र मंडळ
गेल्या दहा वर्षांपासून मंडळ लहान मुलांचे देखावे तयार करत आहे. यंदा मंडळाने अलीबाबा आणि चाळीस चोर हा देखावा केला असून लहान मुलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे याविषयी मंडळाचे सचिव अनिल येनपुरे यांनी सांगितले की, मुलांचे मनोरंजन व्हावे, यासाठी तसेच अलिबाबा ही अनेक पिढ्यांपासून चालत आलेली रंजक कथा यंदा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याला मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील वर्षी ज्युरासिक पार्कचा देखावा बनवण्याचा मानस आहे.
