पुणे : गणेशोत्सवात डी.जे, प्लाझ्मा साउंड यांचा त्रास नागरिकांना होत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे. मात्र, हे करताना ढोल पथकांच्या आवाजालाही मर्यादा घालून सर्वांना समान नियम लावावेत, अशी भूमिका गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.

गणेशोत्सवात काही ठरावीक गणेश मंडळांच्या हट्टापायी पोलीस आणि महापालिका प्रशासन त्यांच्यासमोर झुकते, असा दावा करत हीच स्थिती कायम राहिल्यास पुढील काही वर्षांमध्ये शहराचा गणेशोत्सव केवळ आठ ते दहा गणेश मंडळांपुरताच मर्यादित राहील, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे ‘पुणे शहर गणेशोत्सव समिती’ची बैठक झाली. समितीचे निमंत्रक संजय बालगुडे यांच्या पुढाकारातून ही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शहरातील विविध भागांतील ४२ गणेश मंडळांचे पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. यामध्ये नितीन पंडित, भाऊ करपे, मंदार जोशी, नरेंद्र व्यवहारे, शिरीष मोहिते, शैलेश बढाई, नीलेश वावरे यांचा समावेश होता.

नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या ‘डीजे’, प्लाझ्मा साउंडवर बंदी असली पाहिजे, त्याप्रमाणे आणि ढोल-ताशा पथकांच्या आवाजावरही मर्यादा असली पाहिजे. सर्वांना समान न्याय देणे आवश्यक आहे, अशी भूमिका गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. गणेशोत्सव हा सर्वांचा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सवाचे स्वरुप बदलले असून, काही ठरावीक गणेश मंडळांचा हा उत्सव झाला आहे की काय? असा प्रश्न पडत असल्याची भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या काळात पोलीस आणि महापालिका प्रशासन गणेश मंडळांमध्ये भेदभाव करते. वर्गणी गोळा करून हा उत्सव साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये मंडळात कार्यकर्ते तयार होण्याचे प्रमाण घटत आहे. यास गणेश मंडळांमध्ये केला जाणारा दुजाभाव जबाबदार असल्याचा आरोप बालगुडे यांनी केला. दरम्यान, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पुणे शहर गणेशोत्सव समितीचे निमंत्रण संजय बालगुडे म्हणाले, गणेशोत्सव हा सर्व मंडळांचा आहे. पोलिसांकडून भेदभाव केला जातो. ठरावीक मंडळांना विशेष सुविधा दिल्या जातात. अन्य मंडळांना दुय्यम वागणूक दिली जाते. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे.

गणेशोत्सव आठ ते दहा मंडळांचाच आहे का?

विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यालाच महत्त्व दिले जाते. अन्य मार्गांवरील गणेश मंडळांना दुय्यम वागणूक दिली जाते. मानाची आणि प्रतिष्ठित मंडळांनाच मान देऊन देऊन अन्य गणेश मंडळांबाबत भेदभाव केला जातो. शहराचा गणेशोत्सव हा काही आठ ते दहा मंडळांपुरताच मर्यादित आहे का, असा सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आला.