पुणे : ‘लोकमान्य टिळकांनी धार्मिकतेचा आधार घेऊन समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला. उत्सव मोठा झालाच पाहिजे. परंतु, त्याचे पावित्र्यही जपले गेले पाहिजे. अनावश्यक भपकेबाजी, मोठ्या आवाजातील साउंड सिस्टीम (डीजे) आणि वाहतुकीसह नागरिकांना त्रासदायी ठरणाऱ्या बाबी उत्सवात वाढता कामा नयेत.
गणेशोत्सवात कर्णकर्कश आवाजातील ‘डीजे’ला विरोधच आहे,’ असे मत लोकमान्य टिळक यांचे खापर पणतू डॉ. रोहित टिळक यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, उत्सवाच्या काळात डीजे, प्लाझ्मा तसेच लेझर लाईटच्या वापरावर बंधने घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्या दृष्टिने गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरावर चर्चा सुरू आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉ. टिळक यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
गणेशोत्सवाच्या काळात कर्णकर्कश आवाजात वाजणारे डीजे, उंच साऊंड सिस्टीम्स यांना विरोधच असून, उत्सवात त्रासदायी ठरणारा आवाज नको, अशी स्पष्ट भूमिका टिळक यांनी मांडली. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव हा लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘उत्सव मोठा झाला पाहिजे, मात्र हे करताना त्याचे पावित्र्यही जपले पाहिजे, ही भूमिका बहुतांश नागरिकांची असून, कर्णकर्कश आवाजातील ‘डीजे’ला विरोधच आहे,’ असे टिळक यांनी स्पष्ट केले.
वाढत असलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कर्णकर्कश डीजे, प्लाझ्मा आणि प्रेशर साउंडवर निर्बंध कायम ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ध्वनीमर्यादा आणि ढोल-ताशा वादनाबाबतही नियमांचे पालन आवश्यक असल्याचे न्यायालयीन निर्देशांमध्ये नमूद आहे, त्यामुळे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, असे डाॅ. टिळक म्हणाले.
‘धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून माणसाला मानसिक आधार आणि एक प्रकारचे सामाजिक कवच मिळते. श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली, तरी एखाद्या ‘सुपरपॉवर’समोर नतमस्तक होण्याची भावना माणसाला चांगले आचरण करण्याची प्रेरणा देते, त्यामुळे उत्सवच बंद झाला पाहिजे, असे म्हणणे चुकीचे आहे. उत्सव साजरा करताना त्यावर मर्यादा असणे गरजेचे आहे. हीच भूमिका केसरी सार्वजनिक गणेशोत्सवाची आहे,’ असे टिळक यांनी सांगितले.
‘ढोल पथकांकडून वादनात शिस्त, नवीन ताल’
‘गणेशोत्सवात डीजे, लेझर लाईट तसेच प्रेशर साउंडवर बंदी घालून त्यावर निर्बंध आणणे आवश्यक आहे. मात्र, कोणतेही बदल हे एका दिवसांत होत नाहीत. ‘डीजे’पासून अनेक तरुण लांब जात आहेत, पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीकडे ‘डीजे’ला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. गेल्या काही वर्षांत ढोल-ताशा पथकांनी आपल्या वादनामध्ये शिस्त, नवीन ताल आणि कोरिओग्राफी आणली आहे. अनेक पथके नियमांचे पालन करून वादन करीत आहेत,’ असे डाॅ. टिळक यांनी सांगितले.
