पुणे : गणेशोत्सवात भाविकांच्या गळ्यातील दागिने, मोबाइल संच चोरून पसार झालेल्या चोरांच्या टोळीला विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने हरियाणातील पलवल भागातून अटक केली. गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून १३ लाख रुपयांचे दागिने, मोटार असा २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
‘गणेशोत्सव, तसेच विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या हाेत्या. या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलिसांच्या पथकाकडून करण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार चोरटे हरियाणात पसार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी साडेचार हजार किलाेमीटर प्रवास करून हरियाणायील पलवल गावातून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आले असून, २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,’ अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली.
या प्रकरणी अजय समशेरन विनोदकुमार रूपसिंग कोळी (वय २०, रा. समसाबाद पलवल, हरयाणा), अमन समशेर अनिलकुमार नारायणसिंग कोळी (वय २४, रा. आदर्श काॅलनी, पलवल, हरियाणा), दीपक समशेर राजूभाई सापसिंग (वय २१, रा. हिरानगर काॅलनी, पलवल, हरियाणा) यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणातील एक आरोपी गुजरातमधील अरवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक असल्याची माहिती मिळाली. अरवली पोलिसांच्या सहकार्याने त्याला या गुन्ह्यात ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तेव्हा आरोपीनी गणेशोत्सवात चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हरियाणातील पलवल भागातून आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी मोटारीतून पुण्यात आले होते. त्यांच्याकडून मोटार, तसेच दागिने असा २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, उमेश कारके, उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबूब मोकाशी, सचिन कदम, नितीन मु्ंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहविळे, शशिकांत दरेकर, साहिल शेख, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, अर्जुन थोरात, नितीन बाबर यांनी ही कामगिरी केली.
