पुणे : ‘यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा आहे. त्यामुळे उत्सवातील ८ दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक यंत्रणेला (लाउडस्पीकर) परवानगी देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,’ अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली. गेल्या वर्षी ७ दिवसांसाठी ध्वनिवर्धक यंत्रणेला परवानगी देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

दगडूशेठ मंडळाच्या उत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रासने बोलत होते. ते म्हणाले, ‘यंदा १२ दिवसांचा गणेशोत्सव आहे. अनेक मंडळांकडून जिवंत देखावे साकारण्यात येतात. त्यातून सामाजिक-धार्मिक प्रबोधन केले जाते. काही मंडळांकडून वैज्ञानिक संकल्पनांवर आधारलेले देखावे साकारले जातात. या देखाव्यांसाठी ध्वनिवर्धक यंत्रणेची गरज असते. त्यांचा आवाजही मर्यादित असतो. चांगल्या सकारात्मक गोष्टी समाजात पोहचाव्यात म्हणूनच ध्वनिवर्धक यंत्रणेला आठ दिवस परवानगी देण्याची मागणी केली आहे. अश्लील नाचगाणी, धांगडधिंगा घालण्यासाठी ध्वनिवर्धक यंत्रणा लावण्याला विरोध आहे.’

दरम्यान, ‘मेट्रोच्या सुविधेमुळे गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती भागांत होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने पायाभूत सुविधांचे नियोजन करावे. भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यात यावी,’ अशा सूचना केल्याचेही रासने यांनी स्पष्ट केले.

‘सुरुवातीच्या मंडळांमुळे विसर्जन मिरवणुकीला उशीर’

‘विसर्जन मिरवणुकींमध्ये सकाळी नऊ वाजता मानाचे गणपती प्रस्थान करतात. त्यानंतर रोशणाई नसलेली मंडळे मिरवणुकीत सामील होतात. या मंडळांनतर दुपारच्या सुमारास काही वेळ शिल्लक राहायचा. वेळेचे हे अंतर कमी व्हावे म्हणून, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने दुपारी चारच्या सुमारास प्रस्थान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यंदाही चार वाजता श्रीमंत दगडूशेठ गणपती प्रस्थान करील. सुरुवातीला निघणारे गणपती वेळेत निघाले, तर विसर्जन मिरवणुकीला उशीर होणार नाही,’ असे हेमंत रासने यांनी सांगितले.