पुणे : पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला आहे. या मागणीला पाठिंबा देत पुणेकर नागरिक रस्त्यावर उतरले होते. आता शासकीय यंत्रणांच्या पातळीवर पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तब्बल दोनशे गणेश मंडळांच्या ठिकाणी उत्सवाच्या काळातील सर्व दिवसांत प्रत्यक्ष आवाजाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. आवाज जास्त असल्यास तो कमी करण्यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची यंदा कर्णकर्कश उत्सवातून सुटका होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंडवडमध्ये दोनशे गणेश मंडळांच्या ठिकाणी आवाजाच्या पातळीचे मापन करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. त्याचबरोबर सात महत्त्वाच्या चौकांतही ध्वनीच्या पातळीची तपासणी करण्यात येत आहे. ध्वनिप्रदूषण पातळीचे उल्लंघन आढळल्यास संबंधित गणेश मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे म्हणाले, की गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजली जात आहे. मंडळाचे अधिकारी व कर्मचारी ३०० स्वयंसेवकांच्या मदतीने हे काम करीत आहेत. गणेशोत्सव काळात दररोज सायंकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत ही पातळी मोजली जात आहे. गणेशोत्सवातील सर्व दिवस आणि विसर्जन मिरवणुकीच्या काळातही ध्वनिप्रदूषणाच्या पातळीची नोंद केली जाणार आहे.
सार्वजनिक आरोग्य महत्वाचे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गणेशोत्सव काळातील आवाजाची पातळी तपासली जात आहे. सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणविषयक नियमांचे पालन करून उत्सव साजरा केला जावा, असा मंडळाचा उद्देश आहे. गेल्या वर्षीही याच प्रकारे तपासणी करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्याचे चांगले परिणामही दिसून आले होते, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी सगळीकडेच पातळी जास्त
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या वर्षी गणेशोत्सवात केलेल्या तपासणीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सगळीकडेच ध्वनिप्रदूषण झाल्याचे समोर आले होते. ध्वनिप्रदूषणाची कमाल मर्यादा पातळी दिवसा ७५ डेसिबल आणि रात्री ७० डेसिबलपर्यंत आहे. शहरात सर्वच ठिकाणी आवाजाची पातळी ७५ ते ८५ डेसिबलदरम्यान नोंदविण्यात आली आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात सगळीकडे ध्वनिप्रदूषण होत असल्याची बाब उघडकीस आली. या पार्श्वभूमीवर यंदाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी केली जात आहे.
आवाजाची मर्यादा पातळी
विभाग – दिवसा – रात्री
औद्योगिक – ७५ – ७०
व्यावसायिक – ६५ – ५५
निवासी – ५५ – ४५
शांतता क्षेत्र – ५० – ४०
