पुणे : ‘गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने दिलेल्या नियमावलींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमभंग करणाऱ्या मंडळांविरुद्ध कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला.

गणेशोत्सवातील गर्दीचे नियोजन, ध्वनिप्रदूषणाबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी माहिती दिली. ‘सर्वोच्च न्यायालायने ध्वनिप्रदूषणाबाबत नियमावली आखून दिली आहे. आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मंडळांनी नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. उत्सवाच्या काळात परदेश, आणि देशाच्या वेगवेगळ्या भागांतून भाविक शहरात येतात. गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. भाविकांना गर्दीत त्रास होऊ नये. उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तयारी सुरू केली आहे,’ असे त्यांनी सांगितले.

दहीहंडीत नियमभंग प्रकरणी ११६ खटले

‘दहीहंडीत आवाजाची मर्यादा ओलांडणे, पोलिसांच्या आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी ११६ खटले दाखल करण्यात आले आहेत. ध्वनिक्षेपक यंत्रणेतील प्लाझ्मा साऊंड, प्रेशरमीड ही उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. मंडळांना चार बास आणि चार टॉप वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंडळांनी नियमांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल,’ असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

‘परदेशी नागरिकांची माहिती बंधनकारक’

‘शहरात परदेशी नागरिक वास्तव्यास येतात. तारांकित हाॅटेल, खासगी निवास व्यवस्था (होम स्टे) चालकांनी परदेशी नागरिकांच्या वास्तव्याची माहिती त्वरित पोलिसांना देणे बंधनकारक आहे. ही माहिती न दिल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील,’ असा इशारा त्यांनी दिला.