पुणे : ‘शहरातील विविध सण, उत्सवात उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपक यंत्रणेत ‘प्लाझ्मा’, ‘प्रेशर मीड’ या उपकरणांचा वापर होतो, तसेच प्रखर लेझर झोतही वापरले जातात. ध्वनिक्षेपकांमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. ‘प्रेशर मीड’ आणि ‘प्लाझ्मा साउंड’वर बंदी घालण्यात आली असून, पुणेकरांना आता बदल हवा आहे. गणेशोत्सवासाठी ‘पुणे पॅटर्न’ तयार करून समाजासमोर आदर्श ठेवूयात’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. ‘पुणेकर नागरिक नियमांचे पालन करणारे असून, सर्वांना सोबत घेऊन दिमाखदार गणेशोत्सव साजरा करू या’, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले.

पुणे पाेलीस आणि विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. या वेळी आदर्श गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात आला; तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, राजेश पाटील, उपायुक्त गौहर हसन, कृषीकेश रावले, मिलिंद माेहिते, डाॅ. सागर कवडे, डाॅ. संदीप भाजीभाकरे, डाॅ. प्रशांत अमृतकर या वेळी उपस्थित होते, तसेच पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डाॅ. मिलिंद भोई, उदय जगताप, दत्ता देवकर, विवेक देव, आशिष गांधी, प्रवीण चोरबेले, राजाभाऊ कदम, डाॅ. शंतनू जगदाळे, नवीन नायडू या वेळी उपस्थित होते.

‘गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक नुकतीच झाली. शहरात विविध उत्सवांत उच्च क्षमतेची ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरली जाते. त्या ध्वनिक्षेपकांमुळे सामान्यांना त्रास होतो. नागरिकांसह सर्वपक्षीय नेत्यांना बदल हवा आहे. सर्वांना सोबत घेऊन उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करू या. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पुणेकर नागरिक नियम पाळतात. ते शिस्तप्रिय आहेत. दहीहंडी, गणेशात्सवात उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर करू नये. ‘पुणे पॅटर्न’ तयार करून समाजासमोर आदर्श ठेवूयात,’ असे आवाहन त्यांनी केले.

‘ध्वनिक्षेपक यंत्रणेमुळे आरोग्यावर परिणाम होतो. बदलांना सामोरे जायला हवे. नियमांचे पालन सर्वांनी करावे. पोलीस त्यासाठी आग्रही असतील. सगळ्यांना सोबत घेऊन आनंदात गणेशोत्सव साजरा करू या,’ असे त्यांनी नमूद केले.

नियमांचे पालन करणाऱ्यांचे स्वागत

‘गणेशाेत्सवात नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांचे पोलिसांकडून स्वागत केले जाणार आहे. मात्र, नियम धुडकाविणाऱ्या मंडळांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. ‘प्लाझ्मा साउंड’, ‘प्रेशर मीड’वर बंदी आहे. ध्वनिक्षेपक यंत्रणेत अशा प्रकारचा उपकरणांचा वापर झाल्यास थेट उपकरण जप्त करण्यात येईल. ईद-ए-मिलादच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ध्वनिक्षेपकांबाबत दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. या मिरवणुकीत काहींनी नियमांचे पालन केले नाही. त्यांची ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्त करण्यात आली. ध्वनिप्रदूषण राेखण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यायला हवा. पोलीस दल नियमांच्या अधीन राहून काम करेल,’ असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.