पुणे : गणरायाच्या आगमनासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक राहिल्याने महापालिका प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी रस्ते, स्वच्छता, विसर्जन घाट, कृत्रिम विसर्जन हौद, पथदिवे, आरोग्य सुविधा आणि मंडप परवानग्यांच्या कामांना प्रशासनाने वेग दिला आहे.

गणेशमूर्तींचे स्टॉल कुठे आणि कोणत्या आकारात उभारावेत, यासाठी परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, रस्त्यांची डागडुजी करण्याबरोबरच विसर्जन घाटांची साफसफाई, कचरा व्यवस्थापनाची कामे सुरू करण्यात आली आहेत.

‘उत्सवापूर्वी रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे, तुटलेले पदपथ, अतिक्रमणे आणि धोकादायक झाकणांची माहिती घेण्याच्या सूचना संबधित विभागांना करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दुचाकीवरून रस्त्यांची पाहणी करून प्रत्यक्ष परिस्थितीची नोंद करावी,’ अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

गणेश मंडळांच्या मंडपांना परवानग्या, विद्युत जोडण्या, अग्निसुरक्षा, वाहतूक नियोजन आणि गर्दी नियंत्रण या सर्व बाबींचा अभ्यास करुन प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी, अशा सूचना विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिका प्रशासनाने पोलीस, अग्निशमन दल यांच्यासह अन्य संबंधित यंत्रणांबरोबर आवश्यक समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘गणेश मंडळांनी वीजजोडणी घेताना महापालिकेच्या खांबांवरून बेकायदा पद्धतीने विद्युत जोडणी घेऊ नये. महावितरणकडे अर्ज करून वीजजोड घ्यावी,’ असे आवाहन महापालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात आले आहे.

विसर्जन घाटांवर विशेष लक्ष

गणेश विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे विसर्जन घाटांची स्वच्छता सुरू करण्यात आली असून, घाटांवर आवश्यक प्रकाश योजना, सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष केंद्रित केले आहे. विविध भागांमध्ये कृत्रिम विसर्जन हौद उपलब्ध करून देण्याची तयारीदेखील सुरू आहे. नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी शक्यतो कृत्रिम हौदांचा वापर करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे,’ असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी सांगितले.

रस्ते दुरुस्तीसाठी धावपळ

शहरातील विविध भागातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे वेळेत दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असणार आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमी होत असल्याने जागोजागी वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची अवस्था पाहण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. रस्त्यांची पाहणी करण्यासाठी जाताना चारचाकी ऐवजी दुचाकीवरून जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन, पथ या विभागांबरोबरच इतर विभागांना देखील गणेशोत्सवासाठी त्यांची जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे.