पुणे : गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असल्याने तयारीला वेग आला आहे. गणेशोत्सवकाळात ‘श्रीं’च्या मिरवणुका तसेच देखावे पाहण्यासाठी मध्यवर्ती भागात मोठी गर्दी होते. मध्यवर्ती भागातून निघणाऱ्या मिरवणूकमार्गांची महापालिका आणि पोलीस प्रशासनाने पाहणी केली.
रस्त्यांवरील खड्डे, अपूर्ण खोदाई, ड्रेनेजची समस्या, पादचारी मार्गावरील अडथळे आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेऊन संबंधित विभागांना उत्सव सुरु होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.
आमदार हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखाली कसबा आणि विश्रामबाग वॉर्ड कार्यालयाच्या हद्दीतील प्रमुख मिरवणूक मार्गांची पाहणी करण्यात आली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त पाहणी केली.
कसबा गणपती मंदिरापासून पाहणी करण्यास सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, भाऊ रंगारी गणपती, तांबडी जोगेश्वरी, केळकर रस्ता, पासोड्या विठोबा मंदिर, सोन्या मारुती मंदिर, सोमेश्वर मंदिर, रांका ज्वेलर्स, महाराणा प्रताप रस्ता, कस्तुरी चौक, जैन मंदिर, नाईक हॉस्पिटल, फडके पोलिस चौकी, सेवा मित्र मंडळ, मंडई गणपती, दगडूशेठ गणपती देखावा, गुरुजी तालीम, लक्ष्मी रस्ता आणि पुरम चौक या परिसरांची पाहणी करण्यात आली.
‘गणेशोत्सवासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. देखावे, विविध गणेश मंडळांच्या ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी मध्यवर्ती भागांमध्ये नागरिकांची गर्दी होते. मिरवणुका निघणाऱ्या रस्त्यांवर अजूनही काही प्रमाणात खड्डे आहेत. तसेच, काही रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. ही परिस्थिती बदलण्याचे आदेश संबधित विभागांना देण्यात आले. महावितरण आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या विभागांनी काम करण्यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी नियोजन करावेत.
गणेशोत्सवकाळात नव्याने होणारी रस्ते खोदाई शक्यतो, टाळावी. जुन्या आणि रखडलेल्या रस्त्यांच्या खोदाईची कामे तातडीने पूर्ण करून हे रस्ते समतल करावेत,’ अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या. पथ विभागाने केवळ दुरुस्तीची कामे कागदावर पूर्ण न करता प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या दर्जाची खात्री करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
‘डीपी बॉक्स’ रडारवर
‘शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये सांडपाणीवाहिन्या तुंबल्या आहेत. काही ड्रेनेजमधून घाण पाणी सर्रास रस्त्यांवर येते. त्यामुळे तातडीने याची दुरुस्ती करून अरुंद रस्ते आणि पदपथांवर पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे विद्युत डीपी बॉक्स, उघड्या विद्युत तारा याबाबतही प्रशासनाने लक्ष द्यावे,’ अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेच्या विद्युत विभाग आणि महावितरणने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- प्रमुख मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना
- जुन्या खोदाईनंतर रस्ते समतल करण्याचे आदेश
- गणेशोत्सव काळात नवीन रस्ते खोदाई टाळावी
- उघड्या विद्युत तारा सुरक्षित करण्याच्या सूचना
