पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. संभाव्य घातपाती कारवाया, उत्सवातील गर्दी विचारात घेऊन बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक ‘एआय’ कॅमेऱ्यांची गर्दीवर नजर राहणार आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, मनोज पाटील, संजय पाटील, तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. गणेशोत्सवातील वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेऱ्यांची (एआय) मदत घेण्यात येणार आहे. मध्य भागातील प्रमुख चौकांत २० ठिकाणी निरीक्षण मनोरे उभे करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी पोलीस मदत केंद्रे सुुरू करण्यात येणार आहेत.

‘मानाची मंडळे, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, मध्य भागातील मेट्रो स्थानक, पीएमपी स्थानकांच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गैरप्रकार, गर्दीत होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके गस्त घालणार आहेत. मोबाइल चोरी, दागिने चोरी, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

गणेशोत्सवातील बंदोबस्त

  • चार अतिरिक्त पोलीस आयुक्त
  • १४ पोलीस उपायुक्त
  • ३० सहायक पोलीस आयुक्त
  • २१५ पोलीस निरीक्षक
  • ७०० पोलीस उपनिरीक्षक
  • सात हजार २०० पोलीस कर्मचारी
  • गृहरक्षक दलाचे ११०० जवान
  • शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सराइतांविरुद्ध कारवाई केली आहे. परिमंडळ दोन अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ७०१ सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवाच्या कालावधीत सराइतांनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करू नये, वास्तव्य करण्यास. सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुकीत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. मानाची मंडळे, गर्दीची ठिकाणे, मिरवणूक मार्ग, संवेदनशील भागावर पोलिसांची नजर राहणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सराइतांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असून, प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आल्या आहेत.