पुणे : ‘धडकी भरविणाऱ्या ‘प्रेशर मिड’, ‘प्लाझ्मा साउंड’ या उपकरणांचा ध्वनिक्षेपक यंत्रणेत वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियम धुडकाविल्यास मंडळांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करून यंत्रणा जप्त करण्यात येईल,’ असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी दिला. मात्र, ध्वनिक्षेपक यंत्रणेत चार ‘बास’, चार ‘टॉप’ वापराला परवानगी दिल्याचेही स्पष्ट केले.
पोलीस आयुक्त म्हणाले, ‘गणेशोत्सवासाठी ध्वनिक्षेपकांबाबत नियमावली निश्चित करण्यात आली आहे. मंडळांना ध्वनिक्षेपक यंत्रणेत चार बास आणि चार टाॅप वापरास परवानगी आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही याला सहमती दर्शविली आहे. पण, मंडळांनी ध्वनिक्षेपकांची संख्या वाढविल्यास थेट ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्त करण्यात येईल.’
दरम्यान, पुणे पाेलीस आणि विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना अमितेशकुमार यांनी, ‘नियम पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचा ‘पुणे पॅटर्न’ तयार करू या,’ असे आवाहन केले. ते म्हणाले, ‘ध्वनिवर्धकांमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. पुणेकरांना आता बदल हवा आहे. पुणेकर नागरिक नियमांचे पालन करणारे असून, सर्वांना सोबत घेऊन दिमाखदार गणेशोत्सव साजरा करू या.’
‘न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पुणेकर नागरिक नियम पाळतात. ते शिस्तप्रिय आहेत. दहीहंडी, गणेशात्सवात उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर करू नये. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच सर्वांनी नियमांचे पालन करावे. पोलीसही त्यासाठी आग्रही असतील,’ असे अमितेशकुमार यांनी नमूद केले.
ते म्हणाले, ‘गणेशाेत्सवात नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांचे पोलिसांकडून स्वागत केले जाणार आहे. मात्र, नियम धुडकाविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. ईद-ए-मिलादच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ध्वनिक्षेपकांबाबत दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. नियम न पाळणाऱ्यांच्या ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्त करण्यात आल्या. पोलीस दल यापुढेही नियमांच्या अधीन राहून काम करील.’
दहीहंडी, विसर्जन सोहळ्यावर लक्ष
‘दहीहंडी उत्सव, गणेश विसर्जन मिरवणूक या प्रसंगी मंडळे उच्च क्षमतेची ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरतात. यंदा मर्यादेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. मंडळांनी छुप्या पद्धतीने ध्वनिक्षेपक लावल्यास गुन्हे दाखल करून यंत्रणा जप्त करण्यात येणार आहे. पोलीस ध्वनिक्षेपक यंत्रणेची प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत,’ अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
लेझर झोतांवर बंदी
पुणे जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत तसेच विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर झोतांचा वापर करण्यास मनाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी जाहीर केला. लेझर झोतामुळे नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा आदेश काढण्यात आला आहे. ‘या आदेशाचा भंग करून लेझर झोताचा वापर करताना आढळून आल्यास अशा व्यक्ती, संस्था, मंडळे यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
