गणेशोत्सवातील लाऊडस्पीकर, डीजे, ढोल-ताशांच्या कर्णकर्कश आवाजाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांचे नाव आता राज्यभरात चर्चेत आहे. आधी पुणे महानगरपालिकेच्या जनसभेतून त्यांची झालेली हकालपट्टी आणि नंतर ३ सप्टेंबरला त्यांना झालेल्या मारहाणीमुळे ही ते चांगलेच व्हायरल झाले आहेत. विद्यानंद बापट त्यांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे आणि अभ्यासपूर्ण भूमिकांमुळे ही सर्वत्र चर्चेत आहेत. थेट मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भाषेचे विशेष कौतुक केले आहे.

यातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत बापट यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती. तसेच, पुण्याचा गणेशोत्सव आणि त्यामागची १३० वर्षांची परंपरा अधोरेखित करत “पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवणार”, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

पुणेकरांना गणेशोत्सव साजरा करायला शिकवू नये – रुपाली ठोंबरे पाटील

रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बापट यांच्या पुणेकर असण्यावरच प्रश्न उपस्थित केला होता. “रत्नागिरीहून ७ वर्षांपूर्वी पुण्यात नोकरीला आलेल्या माणसाने पुणेकरांना गणेशोत्सव कसा साजरा करावा हे शिकवू नये,” असे त्यांनी म्हटले आहे. “विद्यानंद बापट हे पुणेकर नाहीत म्हणून गणपती बाप्पा उत्सवाला गालबोट लावण्याची हिंमत झाली”, अशी टीका करत, “पुणे म्हणजे काय हे पुण्यात जन्मलेल्या रक्तालाच कळतं”, असे ठोंबरे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. “गणपती कार्यकर्ता नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, श्रीमंत थोरले,बाजीराव रस्त्यावर लहानाचे मोठे झालेत. पेठेत घराघरांतून, दुकानातून वर्गणी काढून गणपती बाप्पा उत्सव साजरे करण्याचा १३० वर्षाची परंपरा आहे हो. इथे ढोलाच्या थापेवर कार्यकर्त्यांचे बालपण गेलंय, गणपतीच्या वर्गणीसाठी गणपती कार्यकर्ते उन्हात फिरले, फक्त DJ चा विषयच नाही”, असे ठोंबरे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

रुपाली ठोंबरेंच्या टीकेला बापटांचे उत्तर काय?

पॉलिटिकल महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखती दरम्यान बापटांनी यावर उत्तर दिलं आहे. मुलाखतकाराने टीकेबद्दल विचारले असता, बापटांनी रूपाली ठोंबरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. बापट म्हणाले की, “हा पूर्णपणे तार्किक खोटारडेपणा आहे. स्वतः लोकमान्य टिळक, ज्यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली, ते रत्नागिरीहून पुण्यात आले होते. मुळात हा जो युक्तिवाद आहे तो हुकूमशाही प्रवृत्तीचा आहे. डोनाल्ड ट्रम्पसारखी माणसे असा युक्तिवाद करतात. हा तार्किक खोटेपणा आहे.”

विद्यानंद बापटांचा ‘श्रीकृष्ण’ कोण?

असा प्रश्न विद्यानंद बापट यांना न्यूज १८ मराठीच्या कार्यक्रमात विचारण्यात आला. विद्यानंद बापट यांनी महाभारताचा दाखला दिल्याने त्यांना लागलीच तुमचा श्रीकृष्ण कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते सहज बोलून गेले की, “मी स्वतःच.” यावेळी त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोकही सांगितला. “उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥” असं बापट म्हणाले. विद्यानंद बापट यांच्या या श्लोकाचा अर्थ असा की, “मनुष्याने स्वतःच्या मनाद्वारे स्वतःचा उद्धार करावा, स्वतःला अधोगतीला नेऊ नये (स्वतःचा घात करू नये); कारण माणूस स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रूही आहे.”