पुणे : गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन शुक्रवारपासून (१८ सप्टेंबर) शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद केले जाणार आहेत; तसेच मध्य भागातील प्रमुख रस्त्यांवर दुतर्फा वाहने लावण्यास मनाई (नो पार्किंग) करण्यात आली आहे.

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी माेठ्या संख्येने भाविक येतात. सायंकाळी पाचनंतर शहरातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. गर्दी ओसरेपर्यंत प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. कोंडी होऊ नये म्हणून सायंकाळी पाचनंतर मध्य भागातील प्रमुख रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जिजामाता चौक ते गोटीराम भैय्या चौक, मंडई परिसर, शनिपार चौक, बाजीराव रस्ता (शनिपार ते फुटका बुरूज चौक), अप्पा बळवंत चौक ते रविवार पेठेतील मोती चौक, टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय प्रवेशद्वार ते टिळक चौक (अलका चित्रपटगृह), नवी पेठेतील लालबहादुर शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक) या रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, फडके हौद, नाईक रस्ता, महात्मा गांधी रस्ता परिसरात सायंकाळी पाचनंतर एकेरी वाहतुकीचे नियम तात्पुरते शिथिल केले जाणार आहेत. अग्निशामक दल, रुग्णवाहिका, पोलीस वाहने, तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वाहतुकीस बंद असलेल्या रस्त्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.