पुणे : ‘गणेशोत्सवात मध्य भागातील वाहतूक कोंडी टाळणे, व्यापारी पेठांमधील मालाची चढ-उतार (लोडिंग-अनलोडिंग) करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियमावली आखून दिली आहे. मध्यरात्री दोन ते सकाळी अकरा या वेळेत व्यापारी पेठेत मालाची चढ-उतार करण्यात यावी,’ असे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिले आहेत.
‘गणेशोत्सवात मध्य भागात भाविकांची गर्दी होते. मध्य भागातील रविवार पेठ, बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, शनिपार, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ परिसरात माल घेऊन येणारे टेम्पो, ट्रकचालकांनी दिवसा मालाची चढउतार करू नये. व्यापाऱ्यांनी माल उतरविताना या बाबत काळजी घ्यावी. दिवसा मालाची चढउतार करण्यात यावी. उत्सवाच्या कालावधीत मध्य भागात भाविकांची गर्दी होते. मध्य भागातील रस्ते अहोरात्र गजबलेले असतात. भाविकांची सुरक्षा विचारात घेऊन २४ सप्टेंबरपर्यंत व्यापारी पेठेत माल घेऊन येणाऱ्या वाहनांनी मध्यरात्री दोन ते सकाळी अकरा या वेळेत मालाची चढउतार करावी,’ असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
‘वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. मध्य भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दीत मालवाहू आल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, पोलिसांची वाहने तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मुभा देण्यात आली आहे. उत्सवकाळात मध्य भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी, तसेच व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे,’ असे त्यांनी नमूद केले.
