पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास दत्तवाडीतील म्हसोबा चौकात घडली. याप्रकरणी टोळक्याविरूद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतीकसिंह राजेश साळवे (वय २२, रा. दत्तवाडी) असे गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विराज विजय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीकसिंह साळवे १४ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास दत्तवाडीतील म्हसोबा चौकात थांबले होते. त्यावेळी जुन्या रागातून टोळक्याने त्याला गाठले. टोळक्याने प्रतीकसिंहवर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. दगड विटांनी मारहाण करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भरदिवसा हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शांत असलेला दत्तवाडी परिसर पुन्हा एकदा दोन गटांतील भांडणामुळे चर्चेत आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील तपास करीत आहेत.