पुणे : शहरात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका उडाला. माजी नगरसेवकर वनराज आंदेकर याच्या खून प्रकणातील आरोपीच्या भावावर पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. राजर्षी शाहू बँकेसमोरील एका हाॅटेलसमोर ही घटना घडल्याने घबराट उडाली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अक्षय उर्फ बाळा बापू म्हस्के (वय २६, रा. श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ, सर्व्हे क्रमांक २५, आंबेगाव पठार, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर खून प्रकरणात अक्षय म्हस्के याचा भाऊ आकाश याला उशीर अटक करण्यात आली होती. खून प्रकरणातील आरोपींना आकाश म्हस्के याने मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिली होती. त्यानंतर आकाश याला खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. आकाश याचा भाऊ अक्षय हा पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात बुधवारी सकाळी नाश्ता करण्यासाठी आला होता. राजर्षी शाहू बँक चौकात तो थांबला होता. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी अक्षय याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. एक गोळी अक्षय याच्या पायात शिरली. हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. ‘प्राथमिक चौकशीत अक्षय म्हस्के याच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत’, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नेमकं काय घडलं होतं?

१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आंदेकर याचा खून वर्चस्वाचा वाद, तसेच संपतीच्या वादातून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर आंदेकर टोळीने वनराज याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष (वय २०, रा. लक्ष्मी सोसायटी, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) याचा सोसायटीच्या आवारात गोळीबार करुन खून ५ सप्टेंबर २०२५ रोजी केला होता. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याचा खून करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. आयुष कोमकर हा आंदेकर टाेळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा नातू होता. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह साथीदारांना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर १ नोव्हेंबर २०२५ राेजी आंदेकर टोळीने बदला घेण्यासाठी आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश किसन काळे (वय ३२, रा. येवलेवाडी, कोढवा) याचा कोंढव्यातील खडी मशीन चौकात गोळ्या झाडून खून केला होता. गणेश काळे हा रिक्षाचालक होता. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिल्याप्रकरणी समीर काळे, आबा खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांना अटक करण्यात आली होती.

शहरात दोन दिवसात चौघांचा खुनाचा प्रयत्न

शहरात गेल्या दोन दोन दिवसात चौघांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी अक्षय काळे याच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आले. कात्रज बाह्यवळण मार्गावर रिक्षा चालकावर वैमनस्यातून भरदिवसा वार करण्यात आले. कोथरूड भागात एका तरुणावर वैमनस्यातून गजबलेल्या रस्त्यावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आला.