पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सून सोनाली वनराज आंदेकर यांनी पोलीस बंदोबस्तात शनिवारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात गाजावाजा करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात त्यांनी कोणताही अर्ज भरलाच नसल्याचे समोर आले आहे.
कडक पोलीस संरक्षणात, तोंडावर बुरखा घालून आंदेकरला भवानी पेठेतील निवडणूक कार्यालयात आणण्यात आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर त्याने जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, उमेदवारी अर्ज अर्धवट भरलेला होता त्यामुळे आंदेकर यांनी तो अर्ज भरला नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा गुंड आंदेकर आणि कुटूंबिय उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या या तीघांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचारयात्रा, भाषण, घोषणाबाजी करू नयेत, असे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले होते. त्यानंतर शनिवारी बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी पोलीस बंदोबस्तात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. मात्र प्रत्यक्षात त्यांनी कोणतेही उमेदवारी अर्ज दाखल केले नसल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
एबी फॉर्म कोणाचा हे गुलदस्त्यात
गुंड आंदेकर कुटुंबाचा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी संबंध होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज (एबी फॉर्म) मिळणार का? याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. शनिवारी या तीघांनी अर्जच न भरल्याने अद्याप तरी आंदेकर यांची उमेदवारी अपक्ष की पक्षाकडून असणार हे स्पष्ट झाले नाही.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे म्हणाले, बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सोनाली वनराज आंदेकर हे शनिवारी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज हा अर्धवट भरलेला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. अर्ज भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदत आहे. या काळात ते पुन्हा अर्ज भरू शकतात.
बंडू आंदेकर तुरुंगात का आहे ?
नाना पेठेतील टोळीयुद्ध, वर्चस्वाच्या वादातून गणेश विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने आयुष कोमकर याचा नाना पेठेत खून केला होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणाचा सूड उगविण्यासाठी आयुष कोमकर याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित म्हणून आंदेकर कुटूंब तुरुंगात आहे.
बंडू आदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी आगामी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, असा अर्ज आंदेकर यांच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण यांनी न्यायालयात केला होता. ‘निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे’, असे नमूद करून विशेष न्यायालयाने आरोपींना पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यास शुक्रवारी परवानगी दिली. उमेदवारीअर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक ठिकाणी भाषण करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला होता. नाना पेठेतील जामिनीचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी बंडू आंदेकरला धुळे कारागृहातून ताब्यात घेऊन समर्थ पाेलिसांनी नुकतीच अटक केली होती. याप्रकरणी आंदेकरला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय परिसरात बंदाेबस्त
आंदेकरसह त्याची भावजय आणि सुनेला पोलीस बंदोबस्तात भवानी पेठेतील क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी दुपारी आणण्यात आले. त्या वेळी क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे उमेदवारीअर्ज दाखल करणाऱ्या अन्य उमेदवारांना बाहेर थांबविण्यात आले. अर्ज दाखल करण्यास विलंब झाला, अशी तक्रार अन्य उमेदवारांनी केली.
